Raksha Bandhan 2025: 8 की 9 ऑगस्ट, रक्षाबंधनाचा सण नेमका कधी? जाणून घ्या तारीख आणि राखी बांधण्याचा शुभमुहूर्त
Raksha Bandhan 2025: दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. याच दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे, बहिण-भावाच्या नात्याचा सण. ज्याला राखीपौर्णिमा (Rakhi Purnima) म्हणूनही ओळखलं जातं. संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण म्हणजे, भावा-बहिणीच्या नात्यातली ताकद, प्रेम आणि विश्वासाचं प्रतिक. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करते. तर, भाऊ तिला आजन्म तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. तसेच, या सणाचा एक गोडवा जपत भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून एक भेटवस्तू देतो.
दरवर्षी श्रावण महिन्यातील (Shravan) शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. याच दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पण, यावर्षी रक्षाबंधनाचा सण नेमका कधी साजरा केला जावा? याबाबत फारच गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय. कुणी 8 ऑगस्ट म्हणतंय, तर कुणी 9 ऑगस्ट म्हणतंय, यामुळे बहिण-भावाच्या नात्याचा हा सण नेमका कधी साजरा करायचा? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमकं कधी साजरं करायचं? हे सविस्तर जाणून घेऊयात...
रक्षाबंधन नेमकं कधी?
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी 8 ऑगस्टला दुपारी 02.12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्टला दुपारी 01.24 वाजेपर्यंत आहे. अशा परिस्थितीत, उदिया तिथीच्या आधारे, 9 ऑगस्ट 2025, शनिवारी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतील.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय?
9 ऑगस्ट 2025 रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 पर्यंत असेल. म्हणजेच, रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जवळपास 7 तास 49 मिनिटांचा असेल. या दरम्यान तुम्ही कोणत्याही वेळी राखी बांधू शकता. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:53 पर्यंत असेल. राखी बांधण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची छाया राहणार नाही. 9 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वी भद्रा काळ संपणार आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :



















