Akshaya Tritiya 2024 : पंचांगानुसार, उद्या 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण साजरा केला जणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गजकेसरी योग, शश योग यांसारखे अनेक शुभ योग देखील निर्माण झाले आहे. त्यामुळे नवीन वस्तूची, सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
अक्षय्य तृतीयेला वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2024 Muhurta)
अक्षय्य तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी कपडे, सोने-चांदी, वाहन, घर खरेदी करणे शुभ मानले जाते.
सकाळी 05:33 ते 10:37 पर्यंत.
दुपारी 12:18 ते 01:59 पर्यंत.
संध्याकाळी 05:21 ते 07:02 पर्यंत.
रात्री 09:40 ते 10:59 पर्यंत.
अक्षय्य तृतीया पूजा, विधी (Akshaya Tritiya 2024 Puja)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे लवकर उठावे. स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र धारण करावे. तसेच, या दिवशी भगवान विष्णु आणि लक्ष्मीची पूजा करावी. तसेच, या दिवशी प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे धान्य, गूळ, पैसे, वस्त्र गरजूंना दान करावेत.
अक्षय्य तृतीयेचं महत्त्व... (Akshaya Tritiya 2024 Importance)
हिंदू आणि जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी, गृहप्रवेश करण्यासाठी, दागिने, कपडे, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी, लग्न समारंभ, मुंज समारंभ इत्यादीसाठी हा शुभ दिवस मानला जातो.
अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व
अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.
विविध वस्तूंचे दान करण्याची प्रथा
अक्षय्य तृतीया हा वसंत ऋतूचा शेवट आणि उन्हाळ्याच्या प्रारंभाचा दिवस असल्याने या दिवशी उन्हाळ्यात पाण्याने भरलेली भांडी, पंखे, स्टँड, छत्री, कानटोप, साखर, तांदूळ, मीठ इत्यादींचं दान केलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :