सांगली : सांगलीत लोकसभा (Sangli Loksabha) मतदानावेळी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मतदानादिवशी सांगली शहरातील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची तक्रार निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला.
वाचा : Sangli Loksabha : सांगलीत 3 पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण बाजी मारणार? माझा अंदाज
मतदानासाठी चार महिला मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. परंतु, यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु, संबंधित महिलेनं आम्ही मतदान केलंच नाही, तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं? असा जाब विचारला. परंतु, तुमच्या नावावर मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसामध्ये झटापटीचा प्रकार घडला. आता याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
सांगलीत 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात घट
दुसरीकडे, सांगली लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात घट झाली आहे. सांगली लोकसभेसाठी 58 टक्के मतदानाची नोंद झाली. 2019 मध्ये 55.78 टक्के मतदान झाले होते. उन्हाचाही परिणाम मतांवर झाल्याचे दिसून आलं आहे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 2,448 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यापैकी 1,224 केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात आली.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक 61.16 टक्के मतदान
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक 61.16 टक्के मतदान झाले. खानापूर मतदारसंघात सर्वात कमी 51.11 टक्के मतदान झाले. सांगली लोकसभेत भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. 2019 मध्ये भाजपचे संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांचा 1.60 लाख मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली होती.
इतर महत्वाच्या बातम्या