Maharashtra Wardha News: स्ट्रॉबेरी म्हटलं की, महाबळेश्वरची (Mahabaleshwar) आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्ट्रॉबेरीसाठी (Strawberries) अनुकूल वातावरण, थंडावा, मातीचा कस असल्यामुळे महाराष्ट्राच्या महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. पण, महाबळेश्वरच्या तुलनेत जास्त तापमान असलेल्या विदर्भातील एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरी पिकवण्याचा (Agriculture News) प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. 


विदर्भाच्या (Vidarbha) वर्धा जिल्ह्यात (Wardha) एका शेतकऱ्यांने थंड ठिकाणी पिकणारी स्ट्रॉबेरी पिकविली आहे. शेतकऱ्याच्या या यशस्वी प्रयोगाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या कान्होली कात्री येथील तरुण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या स्ट्रॉबेरीतून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. याच स्ट्रॉबेरीचा स्टॉल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दालनात लागला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्टॉलवर पोहचल्यावर त्यांनाही स्ट्राबेरी खाण्याचा मोह आवरला नाही. 


वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कात्री गावातील शेतकरी महेश शंकरराव पाटील यांनी स्ट्रॉबेरीचा हा प्रयोग यशस्वी केला आहे. वर्धा जिल्ह्यातील वातावरण तसं उष्णच असतं. इथल्या वातावरणात एखाद्या गावात स्ट्रॉबेरी पिकेल, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल. पण महेश पाटील यांनी पाऊण एकरात स्ट्रॉबेरी फुलवली. प्रयोग म्हणून त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. पण प्रयोग म्हणून केलेली शेती पाहता पाहता फुलली. 


महेश पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी  नोकरी सोडली. सुरुवातीपासून आवड असल्यानं शेतीतच वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. घरी वडिलोपार्जित अठरा एकर शेतीत कापूस, मिरची, चणा, सीताफळ यांसारखी पिकं ते घेतात. महाबळेश्वरला फिरायला गेले असताना त्यांनी स्ट्रॉबेरीची माहिती घेतली आणि शेतात लागवड करण्याचं ठरवलं. नोव्हेंबरमध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्याकरता मशागत, मल्चिंग केलं. रोप महाबळेश्वर येथून आणली. याकरता ते सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत आहेत. आता स्ट्रॉबेरीची फळ लागली असून उत्पन्नास सुरुवात झाली आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढं स्ट्रॉबेरी लागवडीचं नियोजन राहील, असं पाटील सांगतात. त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्चाचा अंदाज असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


महेश पाटील यांना शेतीत पत्नीचीही साथ आहे. शेतीतील कामासोबतच शेतमाल विक्रिच्या मार्केटिंगच काम करताना त्या नवीन संकल्पना राबवतात. स्ट्रॉबेरी विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचा अवलंब केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 


साहित्य संमेलनाच्या दालनात स्ट्रॉबेरीचा स्टॉल 


स्ट्राबेरीचा स्टॉल साहित्य संमेलनाच्या दालनात लागला. समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तेथे पोहचले, स्ट्रॉबेरीच्या स्टॉलला भेट दिली, स्ट्रॉबेरीचा गोडवाही सांगितला. चव चाखून पाहिल्यावर मदतीचं अश्वासनही दिलं गेलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई