Assam Boka Rice: भारत हा जगातील सर्वात मोठ्या तांदूळ उत्पादक देशांपैकी एक. देशात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. तांदूळ हे खरेदी हंगामातील प्रमुख नगदी पीक असलं तरी, अनेक राज्यांमध्ये बारमाही पीक घेतलं जातं. तांदळाचे असे प्रकार आहेत, जे फक्त भारतातच पिकतात. एवढंच नाहीतर हे प्रकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. भारत बासमती तांदळाचाही मोठा निर्यातदार आहे. याशिवाय, काळ्या मीठाचा तांदूळ (Kalanamak Rice) देखील सर्वात खास प्रकारांपैकी एक. कोणत्याही प्रकारचा तांदूळ असो, त्याचं उत्पादन घेण्यासोबतच तो शिजवायलाही भरपूर पाणी लागतं. भात मुख्यतः गरम पाण्यात शिजवला जातो. पण तुम्ही कधी थंड पाण्यात शिजणाऱ्या तांदळाबाबत ऐकलंय का?
भारतात भातापासून अनेक पदार्थ बनवले जातात. बरेच लोक तांदूळ पाण्यात उकडून खातात. भात शिजवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. तुम्ही म्हणाल काही काय सांगताय? पण खरंच, हा तांदूळ शिजवण्यासाठी गरम पाण्याची किंवा पाणी उकळण्याची अजिबातच गरज भासत नाही. आम्ही आसाममध्ये (Aasam News) पिकणाऱ्या मॅजिकल राईसबाबत बोलत आहोत. म्हणजेच, बोका राईस (Boka Rice) किंवा आसाम राईस (Asam Rice).
बोका तांदूळाचं वैशिष्ट्य काय?
आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिकल राईस (Magic Rice) म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचं वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्यानं केली जाते.
आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होतं. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असतं. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
एकेकाळी बोका राईस अहोम सैनिकांचं राशन होता
इतिहासाची पानं उलटली तर बोका राईसचा एक सुवर्ण इतिहास नक्कीच वाचायला मिळेल. याच तांदळापासून शिजवण्यात आलेल्या भातानं अनेक शत्रूंचा खात्मा करण्यास मदत केली आहे. तसेच, याच तांदळाच्या मदतीनं कित्येक युद्धे जिंकायला मदत केली आहे. ही कथा 17 व्या शतकातील आहे. जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचं रक्षण करण्यासाठी बोका राईस खात होते. हा तांदूळ सैनिकांचं राशन म्हणून युद्धात नेण्यात आला होता. या तांदळाला शिजवण्याची गरज नसल्यामुळे सैनिकांना युद्धभूमीवर त्याचं सेवन करणं सोयीचं ठरत होतं.
बोका राईस 50 ते 60 मिनिटं पाण्यात भिजवल्यानंतर भात तयार व्हायचा. हा तांदूळ बोका राईस, बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.
कसा पिकवला जातो बोका राईस?
बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारनं आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते.
बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढंच अवघड तो पिकवणं आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचं उत्पन्न येतं. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ 145 दिवसांत पिकून काढणीला येतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :