China Clones Cows to Increase Milk Production : चीनकडून (China) माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही विविध वैज्ञानिक प्रयोग (Scientific Experiment) सुरु आहेत. आता चीनमधील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी क्लोनिंगच्या (Cloning) मदतीने 'सुपर काऊ' (Super Cow) म्हणजे सुपर गाय तयार केली आहे. या गायी सामान्य गायींपेक्षा अनेक पटीने जास्त दूध देऊ शकतात, असाही दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सुपर गाय एका दिवसात 140 लीटर दूध देऊ शकते.


सुपर गायीमुळे चीनमधील दुधाचं उत्पादन वाढणार


चीनमध्ये तंत्रज्ञानातील नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आता चीनने दावा केला आहे की, त्यांच्या शास्त्रज्ञांनी एका सुपर गाईची यशस्वी क्लोनिंग केले असून तीन वासरांना जन्म दिला आहे. ही सुपर गाय सामान्य गायींपेक्षा जास्त दूध देते. सुपर गाईंमुळे चीन दूध उत्पादनात जगातील आघाडीचा देश बनू शकतो. चीनच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की, सुपर गायीच्या यशस्वी क्लोनिंगनंतर चीनमधील डेअरी उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच यापुढे चीनला परदेशातून उच्च जातीच्या गायी आयात करण्याची गरज भासणार नाही. 


 100 टन दूध देण्याची क्षमता


चीनच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेली क्लोन गाय म्हणजे सुपर गाय तिच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकेल. मीडिया रिपोर्टनुसार, चिनी शास्त्रज्ञांनी नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये सुपर गायीचं प्रजनन केलं आहे. गायीचे क्लोनिंग करून तीन वासरांना यशस्वीरित्या जन्म झाला आहे. आता चीनमधील शास्त्रज्ञांकडून पुढील दोन वर्षात अशा 1000 गायींचे उत्पादन करण्यावर लक्ष आहे.


तीन सुपर गायींचे क्लोनिंग यशस्वी


चिनी शास्त्रज्ञांनी तीन सुपर गायींचे यशस्वी क्लोनिंग केलं आहे. या क्लोन केलेल्या सुपर गायी सामान्य गायींपेक्षा जास्त प्रमाणात दूध देऊ शकतात. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी शास्त्रज्ञांची ही कामगिरी देशाच्या डेअरी उद्योगासाठी क्रांतिकारक असल्याचं म्हटलं आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, चीनमधील प्रत्येक 10,000 गायींपैकी फक्त पाच गायी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन दूध देऊ शकतात. म्हणूनच चीन क्लोनिंगच्या मदतीने सुपर गाय बनवत आहेत.


हॉलंडमधील एका गायीचं क्लोनिंग


नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड फॉरेस्ट्री सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी 23 जानेवारी रोजी सुपर गायीच्या तीन बछड्यांना यशस्वीरित्या क्लोन केल्याचा दावा केला आहे. हॉलंडमधील (Holland) होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या गायींपासून या तीन बछड्यांचे क्लोनिंग करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, होल्स्टीन फ्रिगियन जातीच्या गायी जास्त दूध उत्पादनासाठी ओळखल्या जातात. या जातीची गाय दरवर्षी 18 टन आणि आयुष्यात 100 टन दूध देते.