Suresh Raina on MS Dhoni: 15 ऑगस्ट 2020 चा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापाठोपाठच त्याच दिवशी टीम इंडियाचा ऑलराउंडर सुरेश रैनानंही (Suresh Raina) आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
त्यावेळी सुरेश रैना 33 वर्षांचा होता. निवृत्तीपूर्वी रैना बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. पण धोनीसोबत त्यावेळी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही महत्त्वाचा भाग होता. रैनानं त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळला होता.
आता सुरेश रैनानं धोनीनंतर काही वेळातच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाचं कारण सांगितलं आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना रैनानं सांगितलंय की, आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहे. या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला धोनीसोबत टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळण्याची संधी मिळाली."
सुरेश रैना म्हणाले की, "माझी आणि एमएस धोनीची कहाणी सारखीच आहे. तो गाझियाबादसारख्या छोट्या शहरातून आला होता आणि एमएस धोनीही रांचीमधून आला होता. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो, तो चेन्नई सुपर किंग्जसोबतही बराच काळ होता." पुढे बोलताना रैना म्हणाला की, "मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी खेळलो. धोनी एक उत्कृष्ट लीडर आणि उत्तम माणूस आहे. त्याच्यासोबत माझं खूपच खास नातं आहे."
कॅप्टन कूलनं जाहीर केलेली निवृत्ती
15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7.29 वाजता महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एमएस धोनीच्या घोषणेनंतर काही वेळातच सुरेश रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
टीम इंडियाचा ऑलराउंडर सुरेश रैना
सुरेश रैनानं टीम इंडियासाठी 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 5 शतकं आणि 5615 धावा केल्यात. सुरेश रैनानंही 18 कसोटी खेळल्यात, ज्यात त्यानं एका शतकासह 768 धावा केल्या. तर 78 टी-20 सामन्यात 1604 धावा केल्या. सुरेश रैनानं भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार