नाशिक :   मे महिना सरत आला तरी पावसाचा पत्ताच नसल्याने त्याचा परिणाम आता भाजीबाजारावर स्पष्ट जाणवू लागला आहे. सकाळच्या  नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत  कोणत्याही  पदार्थाची लज्जत  वाढवणारी  कोथिंबीर (Coriander Price)  सध्या नाशिकमध्ये (Nashik) 'भाव' खात असून 75 रुपयाच्या भावाने विकली जात आहे. त्यामुळे गृहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे.  शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या (Vegetable Price Hike)  दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे.


 कोथिंबीर ही प्रत्येकाच्या घरात वापरलीच जाते. पण आता याच कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट 75  रुपयांना विकली जात आहे. शेतीतील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने शेतीमालावर परिणाम होत आहे.नाशिक बाजार समिती 50% शेतमालाची आवक झाली आहे.  शेतमालाची आवक घटल्याने बाजार भाव तेजीत आहेत.   अशातच सर्वच भाज्यांत ( vegetables rates hike) वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. 


शेतमालाची आवक घटल्याने बाजार भाव तेजीत


आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. बाजारात 75 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत. आठ दिवसांपासून दमटपणासह उकाड्यात वाढ होत आहे. नाशिकसह जळगाव, धुळे, मालेगाव या उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई भासत आहे.  यामुळे अद्यापही शेतमालाची आवक देखील बाधित झाली आहे. नियमित होत असेल्या आवकेच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेलेच आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे. 


मेथी आणि कांदापात 50 रुपये जुडी


शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते.  नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 25 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जात आहेत. कोथिंबीरसह सर्व पालेभाज्या महागल्या आहेत. मेथी आणि कांदापात 50 रुपये जुडी एवढा भाव मिळत आहे.  


हे ही वाचा :


देशात अन्नधान्य महागाईचा भडका, कधी होणार महागाई कमी? RBI ने दिलं स्पष्टीकरण