कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसची (Kolhapur Congress) गेल्या साडेचार दशकांपासून एकहाती धुरा सांभाळणारे तसेच तब्बल 20 वर्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले करवीर विधानसभेचे आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) (वय 71) यांचे आज (23 मे) पहाटे उपचार सुरु असताना निधन झाले. गेल्या रविवारी राहत्या घरी बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. पी. एन. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकीय संकटे येऊनही पी. एन. पाटील यांनी पक्षाशी बांधिलकी आयुष्यभर राहिली.  


पी. एन. पाटील यांचा कोल्हापूर लोकसभेला झंझावाती प्रचार


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (Kolhapur Loksabha) काँग्रेसकडे खेचून आणल्यानंतर गेल्या महिनाभरापासून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या प्रचाराची धुरा आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी एकहाती सांभाळली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे होता. मात्र, कोल्हापूर मतदारसंघांमध्ये वाढलेली काँग्रेसची ताकद पाहता काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. 


कोल्हापूर लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान पार पडले. यामध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभेला करवीर विधानसभा मतदारसंघामधूनच झाले होते. या मतदारसंघातून आमदार पी. एन. पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. गांधी मैदानात झालेल्या शिव शाहू निर्धार सभेमध्येही आमदार पी. एन. पाटील यांनी जोरदार भाषण केले होते. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेचा निकाल काय असेल याची उत्सुकता फक्त कोल्हापूर नव्हे, तर राज्यासह देशपातळीवर चर्चा सुरु असतानाच निष्ठावंत शिलेदार पी. एन. पाटील 4 जून रोजी या जगात नसल्याने काँग्रेससाठी कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 


लोकसभेसाठी पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उमेदवार होते. मात्र, शाहू महाराजांना उमेदवारी देण्यापूर्वी कोल्हापूर लोकसभेसाठी आमदार पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांच्याच नावाची चर्चा होती. उमेदवार निश्चित होण्यापूर्वी दोघांकडून एकमेकांना राजकीय बळ देण्याचा शब्द देण्यात आला. मात्र, उमेदवारीसाठी दोघांनी असमर्थता दर्शवली होती. काँग्रेस नेते कन्हैया कुमार गेल्यावर्षी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्यात हिंदी भाषेवरून चांगलीच जुगलबंदी रंगली होती. 


तथापि, दोन्ही तगड्या उमेदवारांनी नकार दिल्यानंतर शाहू महाराजांचा सरप्राईज चेहरा काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेसाठी देण्यात आला. शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसकडून झंझावाती प्रचार करण्यात आला. आपापल्या मतदारसंघात दोन्ही पाटलांनी शाहू महाराजांसाठी जोडण्या लावल्या होत्या. 


इतर महत्वाच्या बातम्या