Sangli turmeric news : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, वर्षभरात 1 हजार 899 कोटींची उलाढाल
2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटींनी वाढली आहे. त्यामुळं वर्षभरात 1899 कोटींनी उलाढाल वाढली आहे.
Sangli Turmeric News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा हळदीची आवक वाढली आहे. 2020-21 या मागील वर्षापेक्षा 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटींनी वाढली आहे. त्यामुळं वर्षभरात 1 हजार 899 कोटींनी उलाढाल वाढली आहे. मागील 2 वर्षांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे संकट हळद लागवडीच्या क्षेत्रात ओढावले होते. या नैसर्गिक संकटामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम होऊन हळदीची आवक आणि हळदीच्या व्यापारातून होणारी उलाढाल घटेल, असा अंदाज होता. पण यावर्षी आवक वाढल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, मागील वर्षापेक्षा 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटींनी वाढली आहे. गेल्या वर्षभरात 1 हजार 899 कोटींनी 47 लाख 67 हजार रुपयांची खरेदी-विक्री झाली आहे. सांगली मार्केट यार्डात निघत असलेल्या हळदीच्या सौद्यासाठी देशभरातून व्यापारी येत आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळं हळदीला मागणीही वाढली. पण, 2021-22 या वर्षात शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. तरीही उलाढाल वाढली. यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हळदीचे सौदे आणि यातील व्यवहारातील महत्व पुन्हा अधोरेखित झाले. हळद सौद्यासाठी सांगलीच्या बाजारपेठेची देशात ओळख असून, विश्वासहर्ता देखील मोठी आहे. यामुळेच उलाढाल वाढत आहे. शेतकरी हळद सुकविण्यासह अन्य प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करत आहे. यावर्षी कमी कालावधीत जादा हळदीची आवक झाली आहे.
सांगली बाजार समितीची 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षातील हळदीच्या उलाढालीची आकडेवारी
- 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात राजापुरी हळदीची 16 लाख 20 हजार 121 क्विंटल आवक झाली होती.
- या वर्षात 1603 कोटी 91 लाख 97 हजार 900 रुपयांची उलाढाल झाली.
- परपेठ हळदीची 1 लाख 16 हजार 217 क्विंटल आवक झाली असून, उलाढाल 103 कोटी 20 लाख सहा हजार 960 रुपयांची झाली
- 2021-22 या वर्षात राजापुरी हळदीची 19 लाख 13 हजार 435 क्विंटल आवक असून 1709 कोटी 65 लाख 41 हजार 725 रुपयांची उलाढाल झाली
- दोन वर्षातील हळदीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास राजापुरी हळदीची आवक दोन लाख 93 हजार 314 क्विंटलने वाढली
- 105 कोटी 73 लाख 43 हजार 825 रुपयांनी उलाढाल वाढल्याचे दिसतेय
- परपेठ हळदीची आवक एक लाख 80 हजार 938 क्विंटल वाढली असून 86 कोटी 62 लाख 19 हजार 180 रुपयांनी खरेदी-विक्री वाढलीय.