Sugarcane News  : यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. उसाचं क्षेत्र वाढल्याने यावर्षी राज्यात विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत. अद्याप राज्यात 33 लाख टन ऊसाचे गाळप शिल्लक राहिले आहे. त्यामुळे साधारणत 10 जूनपर्यंत काही साखर कारखाने सुरु राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.


सध्याच्या ऊस गाळपाच्या मुद्द्यावरुन एबीपी माझा डीजिटलने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सध्याच्या उसाच्या संदर्भात माहिती दिली आहे. पूर्वी इतके दिवस साखर कारखाने चालू राहत नव्हते. मात्र, राज्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, त्यामुळे हंगाम लांबला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 


या जिल्ह्यात ऊस शिल्लक


सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यातील अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. दरम्यान, राज्यातील अतिरीक्त उसाचे गाळप पूर्ण होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.  दरम्यान, शिल्लक उसाच्या उताऱ्यावरील घट आणि वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा निर्णय देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे उताऱ्यात घट होत आहे. अनेक ठिकाणी ऊस शिल्लक आहे. त्यामुळे उसाचे लवकरात लवकर गाळप व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.  


सर्वात जास्त गाळप सोलापूर जिल्ह्यात


आत्तापर्यंत सर्वात जास्त उसाचे गाळप हे सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 293.30 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 264 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात 253 लाख मेट्रीन टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याती साखर हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप काही साखर कारखाने सुरु आहेत.
 
 महत्त्वाच्या बातम्या: