Sadabhau Khot : कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आजही न्याय मिळालेला नाही, अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारावे लागेल. तसेच राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विकास होणार असेल, रोजगार निर्मिती होणार असेल तर स्थानिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबविला पाहिजे, असे मत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.


सदाभाऊ खोत यांनी शेतकरी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी 29 एप्रिलपासून सिंधुदुर्गातुन केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून खोत हे शेतकऱ्यांचे तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न समजून घेत आहेत. तसेच या प्रशानवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान सुरु आहे. 
आपण आमदार म्हणून भविष्यात पर्यावरण व कृषी पर्यटनातून विकास साधण्यासाठी राजापूर तालुक्यातील एक गाव दत्तक घेणार असल्याची घोषणाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली. कोकणातील शेतकऱ्यांना सुयोग्य अशा मार्गदर्शनाची आवश्यकता असून येथील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही खोत यांनी यांनी यावेळी सांगितले.


मधू दंडवते यांचे भव्य स्मारक व्हावं


कोकणात कोकण रेल्वे आणण्यामध्ये स्वर्गीय मधू दंडवतेंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांची आठवण म्हणून कोकणात त्यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. तर राजापूर रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचे नाव द्यावे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्य मंत्री यांची भेट घेऊन तसे पत्र देणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत मागील सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री असताना मंजुर झालेल्या तालुक्यातील पांगरे बुद्रुक प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असलेल्या तक्रारी व मागण्यांबाबत प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आ. खोत यांनी चर्चा केली व तात्काळ प्रलंबित मागण्या पुर्ण करणेबाबत सुचना केल्या आहेत.


लोकांच्या करांमधूनच शासन धरणांसारखे प्रकल्प उभा करत असते. शासन त्याच्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करत असते. परंतु प्रकल्प अर्धवट स्वरुपात राहिले, तर त्या खर्च केलेल्या निधीचा चुराडा होतो आणि भविष्यात तोच प्रकल्प पुन्हा नव्याने वाढीव अंदाजपत्रके करुन निधी उभा करावा लागतो. ताम्हाणे धरण जवळजवळ 20  ते 21 वर्ष धरण मंजुर होऊन देखील शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्वरुपात धुळ खात पडला आहे. या धरणाला भेट देऊन सदर धरणाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.  रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील काजिर्डा धरण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळूवन देण्यासाठी त्या धरणाला भेट देऊन ग्रामस्थांची भेट खोत यांनी घेतली. गेले 25 वर्षे काजिर्डा ग्रामस्थांनी जामदा प्रकल्पाविरोधात संघर्ष करून लढा सुरु ठेवला आहे. बंद असलेल्या या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीला पुन्हा सुरु करण्यात आले असून यावेळी ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. यासाठी लवकरच आदोंलनाचा पहिला टप्पा आम्ही सुरू करु. लाखोंच्या संख्येने मैदानात उतरु, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.