Raigad Onion News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग पर्यटनासाठी (Alibaug News) प्रसिद्ध आहे. अलिबागला असलेले समुद्रकिनारे, त्यामुळं तिथं असणारी पर्यटकांची गर्दी याशिवाय आता अलिबागला नवी ओळख मिळणार आहे. आता अलिबागच्या पांढऱ्या (White Onion) कांद्याला स्वतःची ओळख मिळणार असून या कांद्याला भौगोलिक नामांकन मिळणार आहे. केंद्र सरकारच्या मुंबई येथील पेटंट नोंदणी कार्यालयामार्फत पडताळणी करून मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आहे.
 
मुंबईलगत असलेल्या अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. यामुळे, अलिबाग तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून याच तालुक्यात पिकणारा 'कांदा' हा देखील प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यातील बहुतांश भागात शेती केली जाते तर पूर्व भागातील काही गावांमध्ये कांद्याचे पीक घेण्यात येते. यामध्ये, तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव, आठगाव येथे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेण्यात येते. तर, या परिसरात पिकणाऱ्या ह्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. 


शेतकऱ्यांकडूनही केली जात होती मागणी


त्यामुळे, अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात याबाबत एक करार करण्यात आला होता. तर, जानेवारी 2019 रोजी पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. तसेच परिसरातील शेतकरी देखील याची मागणी सातत्याने करत होते.


पेटंट नोंदणी कार्यालयात पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी


केंद्र सरकारच्या मुंबई येथील पेटंट नोंदणी कार्यालयात पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. या बैठकीत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वतःची ओळख मिळणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या