Nanded Rain : गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता कुठे दैनंदिन जीवनाची घडी बसत होती. उन्हाळा संपल्यावर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागले होते. त्यानंतर यंदाचा पाऊस उशीरा सुरु झाल्यामुळं पेरणीला देखील उशीर झाला. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलैमध्ये मात्र, पावसानं चांगली हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल झाली आहेत. खरिपातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर तसेच केळी, ऊस, हळद या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पण प्रशासनाकडून ना पंचनामे ना तत्काळ मदत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तेथील शेतकरी संकटात सापडला आहे.


पिकांसह जमिनीही गेल्या खरवडून


नेमकीच अंकुरित झालेल्या पिकांच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलाच कहर केला. यामध्ये जिल्हाभरात अतिवृष्टीनं नद्या नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालं. अतिवृष्टीनं जमिनी खरवडून गेल्या. तर हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अतिवृष्टीनं आलेल्या महापुरात पिकांसह नांगर, मोगडा, पेरणी यंत्र, ठिबक, पाईप, जनावरे तसेच शेती उपयोगी अवजारेही वाहून गेली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
निसर्गाच्या अतिवृष्टीत प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांकडे वक्रदृष्टी होत आहे. कारण अतिवृष्टी झाल्यानंतर पाहणी दौरे करणाऱ्या राजकीय नेत्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत व नुकसानीच्या पंचनाम्याची ग्वाही दिली, पण ती हवेतच विरली. त्यामुळं पिके तर वाया गेली आहेत, पण मदतही नाही. पिकाचे पंचनामे देखील झाले नाहीत. त्यामुळं शेतकरी देखील हवालदिल झाला आहे.


नांदेड जिल्ह्यातील या भागात मोठं नुकसान


गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या सतंतधार पावसामुळं छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ओढे, नदी, नाले तुडुंब भरुन वाहत असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आता पाऊस थांबला पूर ओसरला तरी, या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या खुणा अद्याप प्रत्येक शेताच्या बांधावर, शेतात कायम आहेत. शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापुर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, लोहा, कंधार, मुखेड, किनवट, माहूर, हदगाव या सर्वच तालुक्यातील  खरिपातील कापूस , सोयाबीन, ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच केळी, ऊस, हळद ही पिके आता हातची गेली आहेत. अती पावसामुळं पिके  पाण्याखाली जाऊन सडली असून, ती पुन्हा कसा तग धरतील या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालं आहे. शेत शिवारांचे पंचनामे करुन शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आधार देईल अशी आशा होती. परंतू, आजपर्यंत तरी तसे काही दिसून येत नसल्यानं शेतकरी चिंतेत अडकला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: