RBI Governor on Inflation : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गर्व्हनर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महागाई नियंत्रणात येत असून महागाई दर चार टक्क्यांपर्यंत आणण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. फेब्रुवारी महिन्यात भारतात महागाईचा दर 3.9 टक्के इतका होता. रशिया-युक्रेन युद्धानं मोठी अस्थिरता आणली.  मात्र पतधोरण समितीनं अनेक निर्णय घेतलेत आणि आपण सध्या चांगल्या स्थितीत आहोत असा दावाही त्यांनी केला. 


बॅंक ऑफ बडोदाकडून वार्षिक बॅंकिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन करताना 'बॅंकिंग क्षेत्राचं भविष्य आणि बॅंकिंग क्षेत्रातील आव्हाने' या विषयावर आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी भाष्य केले.  शक्तिकांत दास यांनी म्हटले की,  तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाईत भर पडत आहे. वाढत्या तेलाच्या किंमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे सध्या महागाईत वाढ होत आहे. याला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्ष 2022 मध्ये आम्ही महागाई दर 6.7 टक्के राहणार असल्याचे सांगितले आहे. अशात आयात महागाईमुळे (Imported Inflation) देशातही महागाई वाढतेय. त्यामुळे या मुद्याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. पुढील पतधोरण बैठकीत आम्ही Imported Inflation चा विचार करत महागाई दरात बदल करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


महागाई नियंत्रणात येत असल्याचे सांगत त्यांनी रुपया कुठंपर्यंत खाली येईल हे सध्या सांगू शकत नसल्याचे म्हटले. मात्र, रुपयाच्या दरातील अस्थिरता कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीत महागाई दर 3.9 टक्क्यांवर होता. रशिया-युक्रेन युद्धानं मोठी अस्थिरता निर्माण केली. मात्र पतधोरण समितीनं अनेक निर्णय घेतलेत आणि आपण सध्या चांगल्या स्थितीत आहोत असेही त्यांनी सांगितले. व्याज दरवाढबद्दल विचार करताना आर्थिक विकास वाढीचाही विचार करावा लागतो. सध्या आरबीआयकडून महागाई दर नियंत्रणात आणत 4 टक्क्यांपर्यंत आणावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक नवीन आव्हाने तयार झाली आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि इतर अडचणींची यामध्ये भर पडली आहे. पतधोरण समितीच्या माध्यमातून मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू आहे.  सध्याची परिस्थिती अस्थिर आहे. युद्धाचा कोणी विचारही केला नव्हता. मात्र या युद्धामुळे अनेक बदल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. 


बॅंकिंग क्षेत्रानं तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा


बॅंकिंग क्षेत्रानं तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन यावेळी आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले. बॅंकांना फिनटेक कंपन्यांकडून स्पर्धा असून  बॅंकांनी आपल्या ग्राहकांचा विचार करत बॅंकिंगमध्ये बदल करायला हवा अशी सुचनाही त्यांनी केली.