Paddy & oilseeds sowing : भात आणि तेलबियांच्या लागवडीत मोठी घट, कमी पावसाचा फटका
सध्या चालू असलेल्या खरीप पेरणीच्या हंगामात भाताचे क्षेत्र 24 टक्क्यांनी घटून 72.24 लाख हेक्टरवर आलं आहे. तर तेलबियांच्या पेरणीतही मोठी घट झाली आहे.
Paddy & oilseeds sowing : सध्या संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. मात्र, अद्यापही काही राज्यात म्हणावा तसा पाऊस पडत नसल्याचं चित्र दिसत आहे. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाला आहे. सध्या चालू असलेल्या खरीप पेरणीच्या हंगामात भाताचे क्षेत्र 24 टक्क्यांनी घटून 72.24 लाख हेक्टरवर आलं आहे. तर भारताच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पावसाच्या प्रगतीला उशीर झाल्यामुळं तेलबियांचे क्षेत्र 20 टक्क्यांनी घटून 77.80 लाख हेक्टरवर आहे. कृषी मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, 2021-22 या वर्षात, याच कालावधीत 95 लाख हेक्टरवर भाताची आणि 97.56 लाख हेक्टरमध्ये तेलबियांची पेरणी झाली होती. मात्र, यावेळी पेरणीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. भाताचे क्षेत्र 24 टक्क्यांनी घटून 72.24 लाख हेक्टरवर आलं आहे. तर तेलबियांचे क्षेत्र 20 टक्क्यांनी घटून 77.80 लाख हेक्टरवर आहे. जूनमध्ये नैऋत्य मान्सून सुरू झाल्यानंतर खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. भात हे खरीपाचे प्रमुख पीक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी 1 जून ते 6 जुलैदरम्यान एकूण पाऊस सामान्यतेच्या जवळ होता. मात्र, 1 जून ते 6 जुलै दरम्यान मध्य भारतात 10 टक्के आणि देशाच्या वायव्य भागात 2 टक्के पावसाची कमतरता होती. पूर्वेकडील प्रमुख भात उत्पादक प्रदेशात पावसाची कमतरता 36 टक्के इतकी होती.
दरम्यान, प्रमुख अन्न उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अद्यापही पाऊस हा सामान्य पातळीपेक्षा कमीच आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या राज्यात सध्या 27.872 दशलक्ष हेक्टरवर भात आणि इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. दरम्यान, गहू आणि ऊसाचे प्रमुख उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये पाऊस सामान्य पातळीपेक्षा कमी झाला आहे. धानाचे सर्वाधिक उत्पादक असलेल्या पश्चिम बंगालमध्येही पाऊस कमीच आहे. याचबरोबर झारखंड ओडिशा आणि बिहारमध्ये पावसाचं प्रमाण कमीच आहे. गुजरात आणि केरळमधील काही भागातही सामान्यपेक्षा कमीच पाऊस झाल्याचं चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या: