नाशिक : 'पिढी दर पिढी ती राबतेय, कष्टाच्या घामाचं सिंचन करतेय, म्हणून तर फुलतेय माती देतेय, फळा फुलांचं दान भरभरुन..' चंद्रभागाबाईने अतोनात कष्ट उपसले, अन रया गेलेल्या शेतीला अन संसाराला नवे रुप आणले. चंद्रभागाबाईने लावलेली बागाईत त्यांची सून म्हणून आलेल्या लंकाबाईने तितक्याच निगुतीने जपली आणि वाढवली. आता लंकाबाईच्या सुना राजेश्वरी अन अंजली या दोघीही आजेसासू व सासूचा कष्टाचा वारसा पुढे नेत संसारासह शेतीही फुलवित आहेत. कधीकाळी लावलेल्या अन् जीवापाड जपलेल्या रोपाला आलेला फळाफुलांचा बहर पाहून वर्षे 85 वयाच्या चंद्रभागाबाईंना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे. 


चेहर्‍यावर अनुभवांचं ज्ञान घेत पंच्याऐशीतही शिवारात रमणाऱ्या चंद्रभागाबाईंना त्यांची सून लंकाबाई आणि नातसूना राजेश्वरी आणि अंजली यांचा मोठा अभिमान वाटतोय. एकेकाळी जवळ काही नसतांना शून्यातून वाढवलेल्या शेतीचे पुढे सुनेने आणि नातसुनांनी सोने केले आहे. ही गोष्टच त्यांना या वयातही आनंद देत आहे. बोलता-बोलता त्या सहज भूतकाळात शिरतात. ‘ते दिवस मोठे वाईट होते. 1949 चा काळ होता. वयाच्या 12 व्या वर्षी कारभारी वाघ यांच्याशी लग्न करुन आले, तेव्हा 37 एकर बरडाची जमीन होती. बिनापाण्याची ओहळा-खंगळाची ती जमीन एकसारखीही नव्हती. पीक घेण्यायोग्य देखील नव्हती. कधी कधी दोन दिवस उपाशी राहण्याची वेळ येत होती. नवर्‍याचे संसारापेक्षा कुस्ती खेळण्याकडेच जास्त लक्ष होते. एक मूल झालेलं होतं. अशात एकटीने संसाराचा गाडा ओढणं सोपं नव्हतं. याही परिस्थितीत विहिर खणायची अन जमीन वहिताखाली आणायची जिद्द धरली. 


'त्यावेळी कसेतरी पैसे जमा केले, विहिर निम्मी खणून झाली, पण खणणार्‍यांना द्यायला जवळ पैसेच राहिले नाहीत. मग पुढची विहिर दोघे पती-पत्नीने मिळून खणली. विहिरीला चांगले पाणी लागले. जिराईत जमीन बागाईत झाली, त्यात कोबी, फ्लॉवर, कांदे असा भाजीपाला पिकू लागला. भाजीपाल्यापेक्षा फळबागायतीकडे वळून द्राक्षबागा लावा असा सल्ला अनेकांनी दिला. ते अवघड अन् खर्चिक काम होतं, तरीही करायचे ठरवलं. पिंपळगावहून (Pimpalgaon) रोपे आणून पहिली 1 एकर द्राक्षबाग लावली.


शेतीतील नेहमीची आव्हाने होतीच, पण शेतीचं रुप आता पालटलं होतं. मुलाच्या लग्नाचे वेध लागले होते. मुलाचे लग्न झाले आणि सून लंकाबाईच्या रुपाने लक्ष्मीच घरी आली. तिनेही मोठ्या कष्टाने शेती आणि संसाराकडे लक्ष देण्यास सुरवात केली. मुलगा आणि सून दोघांनीही एकविचाराने शेती करीत चांगले उत्पादन घेणे चालू ठेवले. याच दरम्यान 2014पासून त्यांची शेती ‘सह्याद्री’शी जोडली गेली. ‘सह्याद्री फार्म्स’च्या (Sahyadry Farms) तज्ज्ञांकडून द्राक्षशेतीतील नवे तंत्रज्ञान शिकण्यास मिळाले. आतापर्यंत स्थानिक व्यापाऱ्यास दिली जाणारी त्यांची द्राक्षे आता युरोपच्या (Yurope) बाजारपेठेत निर्यात होऊ लागली. उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्हीही वाढू लागली.


चंद्रभागाबाईच्या डोळ्यात अभिमान दाटतो .... 


सगळं सुरळीत सुरू असताना 2018 मध्ये चंद्रभागाबाईंचे पती कारभारी वाघ यांचे निधन झाले. पुढच्या तीनच वर्षात कोरोना काळात मुलगा लक्ष्मण वाघ यांचे निधन झाले. लक्ष्मण वाघ यांच्या अकाली निधनाने शेती आणि घरातील माणसे हे सर्वच विस्कळीत झालं. याच दरम्यान लंकाबाईंच्या भगवान आणि संतोष या दोन्हीही मुलांची 3-4 वर्षांच्या अंतराने लग्ने झालीत. लंकाबाईंच्या राजेश्वरी आणि अंजली या दोन्ही सुनांनी आता द्राक्षशेतीची सुत्रे हाती घेतली आहेत. उच्चशिक्षित असलेल्या या सुना अल्पावधीत शेतीत तर रुळल्याच, आणि त्या बरोबरच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानही त्यांनी सहजगत्या अवगत केले आहे. घरादाराची सगळी जबाबदारी सांभाळण्याबरोबरच त्यांचे द्राक्षशेतीतील कामांचे नियोजन नेहमीच पाहण्यासारखे असते. चंद्रभागाबाईंच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे सुनबाई लंकाबाई व नात सुना राजेश्वरी व अंजली यांनी समर्थपणे पुढे चालवला आहे. हे सांगतांना चंद्रभागाबाईच्या डोळ्यात अभिमान दाटत राहतो.


इतर महत्वाची बातमी : 


Navdurga 2023 : शेतीतल्या नवदुर्गा... ‘ती’चा ध्यास अभेद्य आणि उत्तुंग!