Nandurbar News : केळी म्हंटल की जळगाव  (Jalgaon) आठवतं. आजच्या घडीला रासायनिक, जमिनीची सुपीकता यामुळे केळी उत्पादनात देखील घट झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील शेतकऱ्याने स्वतः नर्सरी तयार करून त्यातून सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार करून विषमुक्त केळीची शेती (Toxic free farming) करण्याचा प्रयोग केला आहे. अंशुमन पाटील (Farmer Anshuman Patil) यांनी केलेला प्रयोग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 


जळगाव जिल्ह्यासह नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन घेतले जाते. मात्र अलीकडच्या काळात केळी लागवड करण्यासाठी टिशू कल्चरच्या रोपांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करत शहादा तालुक्यातील शेतकऱ्याने नवा प्रयोग केला आहे. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील अंशुमन पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात नर्सरी तयार करून त्यात सेंद्रिय पद्धतीने केळीची (Banana) रोप तयार केली आहेत. या सेंद्रिय केळी रोपांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आसून सेंद्रिय रोपांमध्ये मरचे प्रमाणही कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात होत असल्याचं पाटील सांगतात. 


नंदुरबार जिल्ह्यातील अंशुमन पाटील हे गेल्या बारा वर्षापासून केळीचे उत्पादन घेत आहेत. मात्र हे करत असताना केळी लागवडीसाठी बाहेरून रोप मागून लागवड करत असताना रोपांवर पडणारी मर तसेच रोप आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे उत्पादनात घट येत असल्याने पाटील यांनी स्वतः नर्सरी तयार करून त्यातून सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार करून रेसिड्यू फ्री केळीचे उत्पादन घेत आहे. सेंद्रिय पद्धतीने रोप तयार करण्यासाठी लागणारा खर्चही कमी असून टिशू कल्चरचे रोप घेतल्यास पंधरा रुपयापर्यंत मिळते. तर सेंद्रिय रोप 9 रुपयात तयार होत असल्याने त्यातही पैशांची बचत होत असते.


दिल्लीच्या प्रयोगशाळेत तपासणी 


दरम्यान अंशुमन पाटील यांनी आपल्या शेतात गेल्या दहा वर्षापासून सेंद्रिय पद्धतीच्या अवलंबन करून केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असून यासाठी खत म्हणून हिरवळीच्या खतांचाही ते वापर करत असतात. पाटील यांनी शेतातच गांडूळ खताची निर्मिती केली असून त्यातील उत्पादित खताचा शेतीसाठी वापर करत असतात. लागवड केलेल्या केळीला 25 ते 30 किलो वजनाचा घट आला असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले असून त्यातून याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महत्वाचे केळीचे दिल्ली येथील एका खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असून त्यात कुठल्याही प्रकारचा रासायनिक घटक नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. 


रासायनिक मुक्त शेती ही चळवळ


दरम्यान अंशुमन पाटील यांच्यासारखे अनेक शेतकरी केळी उत्पादन घेतात. मात्र अलीकडच्या काळात रासायनिक खतांमुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे पाटील यांनी वेगळी वाट चोखाळत इतर शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखविला आहे. दिल्ली झालेल्या तपासणीत हा प्रयोगही यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पाटील यांनी पिकवलेल्या केळीला रासायनिक घटक मुक्त पदार्थाचा दर्जा मिळाला असून त्याची विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे पाटील सांगतात. पाटील यांच्यासोबत परिसरातील अनेक शेतकरी रासायनिक शेती सोडून आता सेंद्रिय केळी लागवडीकडे वळाले आहेत. पाटील यांच्याकडून रोप आणि इतर वस्तू खरेदी करत असून त्यातून त्यांचे उत्पादन वाढले असल्याचे शेतकरी सांगतात. रासायनिक खतांना फाटा देत पाटील यांनी ग्रामीण भागात सुरू केलेली रासायनिक मुक्त शेती हा उपक्रम आता चळवळ बनली असून ग्रामीण भागातील अनेक शेतकरी याकडे वळले आहेत.