Geranium farming : अहमदनगर जिल्ह्यातील मेहेकरी येथील दोन माजी सैनिकांनी पारंपरिक शेती पिकांना फाटा देत यशस्वी जिरेनियमची शेती केली आहे.  पारंपरिक पिकांना शाश्वत दर मिळत नसल्याने त्यांनी निवडलेल्या जिरेनियम पिकामुळे वर्षाकाठी त्यांना लाखोंचा नफा मिळत आहे. गोपीनाथ डोंगरे आणि महेंद्रसिंग चौहान अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहे. हे दोघेही माजी सैनिक आहेत.


अहमदनगरच्या मेहेकरी येथील शेतकरी गोपीनाथ डोंगरे आणि महेंद्रसिंग चौहान हे दोघे शेतकरी  माजी सैनिक आहेत. देशसेवा करून घरी परतल्यावर या दोघांनी शेतीची वाट धरली. सुरुवातीला वडिलोपार्जित शेतीत त्यांनी कांदा, ज्वारी, गहू यासारखी पारंपरिक पिकं घेतली. मात्र, पारंपरिक पिकांमधून म्हणावं तेवढं उत्पन्न मिळत नसल्याने कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी जिरेनियमचं पीक घेण्याचं ठरवलं. एक एकर शेतावर त्यांनी जिरेनियमचे दहा हजार रोपं लावली. त्यातून एक टन जिरेनियमपासून त्यांना एक लिटर तेल मिळत आहे. त्याला बाजारात जवळपास बारा हजार रुपयांचा चांगला दर मिळत असल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली.




जिरेनियमपासून या माजी सैनिकांना तीन महिन्यांना एक ते सव्वा लाखाचं उत्पन्न मिळत आहे. सुरुवातीला रोपांसाठी आणि इतर मशागतीसाठी त्यांना सत्तर हजारांचा खर्च आला आहे. मात्र, त्यानंतर चार वर्षे हे पीक घेता येतं. वर्षाकाठी खर्च वजा जाता या शेतकऱ्यांना तीन ते चार लाखांचा नफा अपेक्षीत आहे. जिरेनियम पिकाला कोणतेही जनावर खात नसल्याने पीक राखण्याची चिंता नाही. त्यातच शाश्वत दर मिळत असल्याने इतरही शेतकऱ्यांनी हे पीक घेण्याचा सल्ला या माजी सैनिकांना दिला आहे. 


महिलांची सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये जिरेनियमचा वापर होत असल्याने बाजारात त्याची चांगली मागणी असते. भारतात जिरेनियमची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी ही शेती केल्यास त्यांना निश्चित बाजार उपलब्ध होईल असं हे शेतकरी सांगतात. पारंपरिक पिकांसोबतच अशी पिकं घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: