महाराष्ट्रात युरियाचा साठा संपत आलाय, कृषिमंत्र्यांचं जे.पी. नड्डा यांना पत्र; केंद्राकडे तातडीची मागणी
शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन सुरळीत होण्यासाठी केंद्राने ही मागणी गांभीर्याने घेतली पाहिजे, असे भरणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Mumbai News: महाराष्ट्रात 2025 रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहीत राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ 2.36 लाख मॅट्रिक टन इतकाच राहिला असल्याने तातडीने युरिया पुरवठा होण्याची गरज त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
युरियाचा साठा झपाट्याने कमी
राज्याला एप्रिल ते जुलै दरम्यान केंद्राकडून 10.67 लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप होणे अपेक्षित होते, मात्र आतापर्यंत 8.41 लाख मेट्रिक टन म्हणजेच फक्त 79 टक्के युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्याचे वाटप 2.79 लाख मेट्रिक टन युरियापैकी फक्त 0.96 लाख मेट्रिक टन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.राज्यात खरीप हंगामातील पेरणी जवळजवळ 98 टक्के पूर्ण झाली असून, एकूण पेरणी क्षेत्र 144 लाख हेक्टर आहे. यंदा मक्याची पेरणी 14.30 लाख हेक्टरवर झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 54 टक्क्यांनी वाढलेली आहे. या परिस्थितीत कापूस, मका आणि इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी वाढली आहे.
युरियाचा त्वरित पुरवठा होणे अत्यंत गरजेचे
कृषिमंत्री भरणे यांनी पत्रात सांगितले की, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या युरियाच्या वाटपाची त्वरित पूर्तता करावी आणि प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावा. यासोबतच, आगामी रब्बी हंगामासाठी 12 लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे. माहितीप्रमाणे, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरियाचा त्वरित पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन सुरळीत होण्यासाठी केंद्राने ही मागणी गांभीर्याने घेतली पाहिजे, असे भरणे यांनी पत्रात नमूद केले आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पाण्यात
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.
























