U19 World Cup: अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाकिस्तानचा (Australia vs Pakistan) 119 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलंय. महत्वाचं म्हणजे, पाकिस्तानच्या संघानं हा सामना जिंकला असता तर, त्यांचा उपांत्य फेरीत भारताशी सामना होऊ शकला असता. उपांत्यपूर्व फेरीत भारत आज बांग्लादेशशी भिडणार आहे. तर, आजच्या उपांत्यपूर्वी सामन्यात जिंकणारा संघ ऑस्ट्रेलियाशी उपांत्य फेरीत भिडणार आहे. भारत आणि बांगलादेश 2020च्या अंतिम फेरीत आमने-सामने आले होते. त्यावेळी भारतानं बांगलादेशचा पराभव करून विश्वचषकावर नाव कोरलं होतं.


या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार कासिम अक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कॅम्पबेल केलवे आणि टिग विली या दोन्ही ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 16.4 षटकांत 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॅम्पबेल 47 धावा करून बाद झाला. पण विलीनं संयमी खेळी करत अंडर-19 विश्वचषकातील त्याचं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, 38व्या षटकात 71 धावावर असताना तो माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोरी मिलरनं 64 धावांची उत्कृष्ट खेळी केली. ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 7 विकेट्स गमावून 276 धावा केल्या.


ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेल्या 277 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघांची सुरुवात खराब झाली. आस्ट्रेलियानं पहिल्या 5 षटकात पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर मोहम्मद शहजाद आणि हसिबुल्ला खान यांना माघारी धाडलं. त्यानंतर पाकिस्तानचे पाठोपाठ विकेट्स पडले. पाकिस्तानच्या संघानं 100 धावांत 7 फलंदाज गमावले. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेर पाकिस्तानच्या संघ 35.1 षटकात 157 धावांत ऑलआऊट झाला. पाकिस्तानच्या 5 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. मेहरान मुमताजनं सर्वाधिक 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विल्यम सेल्झमननं 3 तर, टॉम व्हिटनी आणि जॅक सेनफेल्डने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha