Grain Festival : बारामतीत आजपासून धान्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस हा धान्य महोत्सव चालणार आहे. थेट शेतकरी आणि ग्राहक या संकल्पनेतून हा धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. हा धान्य महोत्सव अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीनं आयोजित करण्यात आले आहे. हे धान्य महोत्सवाचे यंदाचे 8 वे वर्ष आहे.  8 ते 10 एप्रिल दरम्यान बाजार समितीच्या रयत भवन येथे धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.


बारामतीतील रयत भवनमध्ये या धान्य मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धान्य महोत्सवात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गटांनी उत्पादित केलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भरडधान्य, कडधान्य, हळद,देशी गाईचे तूप, गुळ, काकवी, फळांचा जाम, मातीची भांडी, डाळी, प्रक्रिया उद्योग, रत्नागिरी हापूस आंबा, रत्नागिरी कोकण काजू, घाण्याचे तेल, मसाले, चटण्या, फळ रोपे, भाजीपाला रोपे अशी अनेक  उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात आला पाहीजे असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले.


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदाच्या वर्षी धान्य महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळं घरगुती वापरासाठी वर्षभर लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य थेट शेतकऱ्याकडून खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये गहू  तांदूळ, ज्वारी, भरडधान्य, काबुली, हरभरा (छोले), साधा हरभरा, बाजरी, काजू, बदाम, हळद इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. तसेच शेतातून थेट आपल्यापर्यत कलिगडे, खरबूज, रंगीत ढोबळी मिरची, टोमँटो, कादा, काकडी इत्यादी भाजीपालाही या महोत्वात उपलब्ध करण्यात आला आहे.


या धान्य महोत्सवात भेसळमुक्त, खात्रीशीर व ताजा शेतीमाल येणार असल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. मध्यस्थी वा दलाली वाचल्याने ग्राहकांना स्वस्त माल मिळणार व शेतकऱ्यांनाही परवडणार आहे. शेतकऱ्यांना इतरांचाही विविध शेतीमाल पाहता येणार व त्यांची यशोगाथा कळणार, अधिकाऱ्यांचे देखील मार्गदर्शन मिळणार आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार मालाची खरेदी करता येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: