Sugarcane Farmers : राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातीलसुद्धा शिल्लक उसाचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सर्व शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली. परंतू, उसाची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झाला की त्या उसाचं गाळप करणं अवघड झालं आहे. हिंगोली जिल्ह्यात 5 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस शिल्लक आहे. शिवाय तोडणीसाठी कामगार नाहीत हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे.




 
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील अल्पभूधारक शेतकरी शिवराम अडकिने यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेत जमिनीवर त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये उसाची लागवड केली. लागवड केल्यानंतर याची नोंद संबंधित कारखान्याकडे केली होती. ऊस लागवड होऊन आज 16 ते 17 महिने पूर्ण झाले आहेत. परंतू, अद्यापही कारखान्याने ऊस तोडणीसाठी त्यांच्या शेतामध्ये कामगार पाठवले नाहीत. आता ऊस तोडणीचा पूर्णपणे कालावधी निघून गेला आहे. अधिक कालावधी झाल्यानं अनेक ठिकाणी उसाला तुरे फुटले आहेत. आता वाढत्या तापमानामुळं शेतातील उभा असलेला ऊस वाळत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या उसाला जोपासण्यासाठी मोठे कष्ट केलं असल्याची माहिती शेतकरी अडकिने यांनी दिली. शिवराम यांनी दोन एकरवरील उसाच्या पिकावर आतापर्यंत एक लाख रुपये खर्च केला आहे. परंतू हा वाळलेला ऊस त्यांना खर्च केलेले पैसेसुद्धा वसूल करुन देतो की नाही याची त्यांना शाश्वती नाही, हे सांगताना शिवराम यांना अश्रू अनावर झाले.




 
अशीच काहीशी परिस्थिती आहे याच गावातील पराग अडकिने यांची. पराग यांचासुद्धा  चार एकर ऊस संपूर्णपणे वाळून जात आहे. पराग यांनी त्यांच्या या चार एकर शेतात  दोन लाख रुपये खर्च करुन उसाची लागवड केली आहे. परंतू आता या उसाची तोडणी करण्यासाठी कारखानदार बगल देत आहेत. त्यामुळं शेतातील उभा असलेला संपूर्ण ऊस आता वाळून जात आहे. यामुळं आता या उसाची तोडणी केली तरी सुद्धा उसाच्या वजनामध्ये विक्रमी घट होणार आहे. उसाच्या वजनात 70 ते 75 टक्के घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.




 
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच हजार हेक्‍टर शेतजमिनीवरील एकूण 4 लाख 95 हजार टन ऊस शेतात उभा आहे. वाढत्या तापमानामुळं संपूर्ण ऊस शेतात वाळून जात आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी सरकारनं या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.