Red Banana Farming Success: देशभरात अनेक उच्चशिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देऊन लाखो रुपयांचं उत्पन्न घेताना दिसतात. काहीजण पारंपरिक पद्धतीच्या शेतीला बगल देत आधूनिक पद्धतीनं, तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती यशस्वी करून दाखवतात. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या एका उच्च शिक्षित युवकाच्या हटके प्रयोगाची गावभर चर्चा आहे. सिविल इंजिनिअरींग झालेल्या या तरुणानं आपल्या 4 एकरात लाल केळीचं उत्पादन घेत केळीतून 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. 


देशात मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये तसेच मेट्रो शहरांमध्ये लाल केळीला मोठी मागणी आहे. याचाच विचार करत नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा या तरुणानं निर्णय घेतला. आता 4 एकरातून हा अभियंता 35 लाखांचं उत्पन्न घेतो. ही कोणत्याही  इंजिनिअर नोकरदाराला मिळणाऱ्या साधारण पॅकेजजपेक्षा अधिक आहे.


करमाळ्याच्या इंजिनिअरची कमाल


करमाळ्याच्या वाशिंबे गावातील अभिजित पाटील या शेतकऱ्यानं लाल केळीची यशस्वी लागवड केली आहे. उच्च शिक्षण झालेल्या तरुणाला नोकरीचा मोह आवरणं तसं कठीण. त्यात सिविल इंजिनिअरिंगची पदवी असल्यानं चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल अशी खात्री असतानाही या शेतकऱ्यानं शेती करण्याचा निर्णय घेतला.अभिजीत पाटील यांनी चार एकरात ६० टन केळीचं उत्पादन घेतलं आहे. सगळा खर्च काढला तर त्यांना ३५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून मेट्रो शहरातील उच्च वर्गात लाल केळीची चांगली लोकप्रिय झाली आहे.


कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय


अभिजीत पाटील या तरुणाने त्यानं इंजिनिअरींगचं शिक्षण डीवाय पाटील कॉलेज, पुण्यातून घेतलं आहे. २०१५ मध्ये त्याने शेती करायचा निर्णय घेतला होता. सात ते आठ वर्षात त्याने शेतीत नवनवीन प्रयोग केले. डिसेंबर २०२० मध्ये अभिजीत पाटील यांनी चार एकर जमिनीत लाल केळ्याची शेती केली. सध्या अधिक फायदा मिळत असल्यामुळे त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे.सुरुवातीला ज्यावेळी त्याने उत्पादन घेतलं, त्यावेळी माल कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याचे मार्केटींग कौशल्य वापरले आणि पुणे, मुंबई, दिल्ली येथील रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये केळी विकली.


आरोग्यासाठी लाल केळी अधिक फायद्याची


लाल केळी आरोग्यासाठी अधिक फायद्याची आहे. त्याची साल लाल आहे, त्याचबरोबर त्याचं फळ काही प्रमाणात पिवळ्या रंगाचं आहे. त्यामध्ये सुगर मर्यादीत असते. त्याचबरोबर ही केळी कॅन्सर आणि ह्दय रोगापासून लोकांना दूर ठेवते. रोज एक केळ खाल्ल्याने सुध्दा आवश्यक असलेली उर्जा निर्माण होते. ही केळी खाल्ल्याने मधुमेह हा आजार होण्याची शक्यता अधिक कमी असते.