Kangana Ranaut On Farmers Protest : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेल्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक आरोप केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याआधी  तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे तीला खासदार झाल्यानंतर विमानतळावर CISF जवानाने कानशिलात लगावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाने शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. तिच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. 


कंगना रणौतन आपल्या मुलाखतीत आरोप करताना म्हटले की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या.






तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता...


कंगना रणौतने याच मुलाखतीत म्हटले की,  'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते, असे कंगनाने म्हटले. 


कंगनाच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनांचा संताप


दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 600 पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे. 


कंगना रणौत यांच्याकडून यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली आहेत. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आल्याकडे नवले यांनी लक्ष वेधले. 


कंगना रणौत करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या  षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत  असेही डॉ. नवले यांनी म्हटले.