Ahmednagar News Farmers Protest : किसान सभेचे हिरडा आंदोलन तीव्र ; राजूर येथील आदिवासी मंडळाच्या कार्यालयात घुसून हिरडे ओतले, मुक्काम सत्याग्रह तीव्र करणार
Ahmednagar News : राजूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत घुसून अधिकाऱ्यांच्या टेबलावर हिरडा ओतून आपला निषेध व्यक्त केला.
Farmers Protest : हिरड्याला रास्त भाव जाहीर करा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करा आणि भंडारदरा धारणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्या या प्रमुख मागण्यांसाठी राजूर (Rajur) येथे सुरू असलेले अखिल भारतीय किसान सभेचे (All India Kisan Sabha) मुक्काम आंदोलन आज तिसऱ्या दिवशी तीव्र करण्यात आले. राजूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत घुसून अधिकाऱ्यांच्या टेबलावर हिरडा ओतून आपला निषेध व्यक्त केला. राजूर मुक्काम आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असूनही आदिवासी मंडळाच्या कोणीही आंदोलकांना भेट दिली नाही. परिणामी आंदोलकांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली.
भंडारदरा धरणातील पाण्यावर जिल्हा सुजलाम सुफलाम होतो. मात्र ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी साठते त्या भंडारदरा धरणाच्या आजूबाजूच्या नऊ गावांना मात्र उन्हाळ्यात ओंजळभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर चालावे लागते. भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून या शेतकऱ्यांना पिण्याचे आणि शेतीचे पाणी द्यावे ही मागणीही आंदोलनात घेण्यात आली असल्याची माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
आदिवासी गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक वाड्यांना रस्ते नाहीत. आंदोलनात हे सर्व प्रश्नही घेण्यात आले आहेत. जोपर्यंत हे सर्व प्रश्न सुटत नाही, नाशिक येथून आदिवासी महामंडळाचे कार्यकारी संचालक राजुराला आंदोलनाच्या मंडपात येऊन हिरडा खरेदीबाबत लेखी देत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांच्यावतीने डॉ. नवले यांनी जाहीर केले आहे. वाढलेल्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना प्रशासन याकड दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अजित नवले यांनी केला आहे.
डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, ज्ञानेश्वर काकड, शिवराम लहामटे, वसंत वाघ, संगीता साळवे, निर्मला मांगे, कुसा मधे,बहिरू रेंगडे, दूंदा मुठे, लक्ष्मण घोडे, गणपत मधे, नवसु मधे, भरत झडे, श्रमिक मुक्ती दलाचे स्वप्नील धांडे, भाकपचे ओंकार नवाळी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.