नाशिक : आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीमध्ये सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातच कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात हे दर आणखी खाली कोसळतील अशी भीती व्यक्त केली जात असल्याने बळीराजा संतप्त झालाय.
नाशिकमध्ये टोमॅटोचे दर चांगलेच घसरले आहेत. शेतकऱ्यांना एका किलोमागे अवघा दोन ते तिन रुपये दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला असतांनाच आता कांद्याला देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण झालीय. पंधरा दिवसांपूर्वी ज्या उच्च प्रतीच्या कांद्याला क्विंटलला तीन ते चार हजार रूपये भाव मिळत होता, तोच कांदा आज व्यापाऱ्यांकडून दीड ते दोन हजार रुपयांनी खरेदी केला जात आहे. त्यामुळे कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे.
राजस्थानमधील नवीन कांद्याची होणारी आवक, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आलेला कांदा, यासोबतच कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी उशिरा केलेली कांद्याची लागवड याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याचे दर कोसळले असून येत्या काही दिवसात हे दर आणखी खाली येतील अशी भीती व्यक्त केली जातीय. असे झाले तर कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कांद्याची प्रतही उत्तम असल्याने या कांद्याला देशभरातून चांगली मागणी असते. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो ला 22 ते 25 रुपये येतो. मात्र सध्या हा खर्चही निघत नसल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट उभं राहीलय. हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा, तसेच काही महिन्यांपासून ज्यांनी आपला कांदा कमी दरात विकलेला आहे त्यांना दहा रुपये प्रति किलो याप्रमाणे नुकसान भरपाई अनुदान द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलीय.
टोमॅटो खालोखाल कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा समोर मोठं संकट उभं राहीलय. जर सरकारने या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर येत्या काळात शेतकऱ्यांचा संयम सुटेल आणि त्यांच्या मोठ्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेतकरी वर्गातून देण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या