Raju Shetti : ब्राझीलमध्ये (Brazil) गेल्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन (Sugar production) घटलं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेला चांगला दर मिळत आहे. मात्र, भविष्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्राझीलमध्ये वाढणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करता देशातील साखरेच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथेनॅालच्या दरामध्ये (Ethanol Rate) प्रति लिटर पाच रुपयांची वाढ करावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांच्याकडे केली आहे. राजू शेट्टी यांनी दिल्लीत पंकज जैन यांची भेट घेतली.
देशात दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात जवळपास 350 लाख टनाहून अधिक साखरेचं विक्रमी उत्पादन होऊ लागले आहे. तर देशातंर्गत बाजारपेठेत 260 ते 270 लाख टन साखरेचा खप आहे. यामुळं भविष्यात ब्राझील व इतर देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्यास भारतीय साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सध्या केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॅाल करण्यास परवानगी दिल्यानं पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॅाल मिसळले जावू लागले आहे. यामुळं गतवर्षी केंद्र सरकारचा जवळपास 53 हजार कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले आहे. ऊसापासून सी हेव्ही , बी हेव्ही व थेट रसापासून देशामध्ये गेल्यावर्षी 825 कोटी लिटर इथेनॅाल निर्मीती केली गेल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
शेती क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानाबाबत देश पिछाडीवर
देशातील शेतकऱ्यांनी ऊसाचे पिक हे खात्रीशीर पैसे मिळणारे पिक आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस पिकाकडे वळू लागले आहेत. यामुळं केंद्र सरकारनेही या उद्योगातून सरकारला मिळणारा सर्वाधिक महसूल व पेट्रोल खरेदी मधून वाचणारे परकीय चलन या सर्व गोष्टींचा विचार करून इथेनॅाल खरेदी दरात पाच रूपयांची वाढ करण्याची मागणी राजू शेट्टींनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नवी दिल्लीत भारतीय कृषक समाज यांच्या वतीनं भारतीय शेतीतील डिजीटाईलायझेशनमुळे होणारे फायदे व तोटे , शेती क्षेत्राच्या डिजीटल धोरणामध्ये आवश्यक असेलेले बदल याबाबत देशातील शेतकरी नेते व तज्ज्ञांची परिषद घेण्यात आली. या परिषदेत देखील शेट्टी सहभागी झाले होते. देशपातळीवर आज डिजीटल इंडियाचा बोलबाला सुरू आहे. पण शेती क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानाबाबत अजूनही देश पिछाडीवर आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागल्याचे शेट्टी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: