(Source: ECI/ABP News/ABP Majha)
10वी पास शेतकरी केळी उत्पादनातून कमावतो दरवर्षी 70 लाख रुपये! ही तर इंजिनियरपेक्षाही अधिक कमाई
अवघ्या २६ महिन्यांच्या कालावधीत आधुनिक तंत्राचा वापर करत तीन वेळा केळीचं उत्पादन घेणारा देशातला पहिलाच शेतकरी ठरला..
Farmer Success Story: केवळ १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या एखाद्या शेतकऱ्याची वार्षिक कमाई किती असू शकेल? काही हजारांमध्ये, फार तर लाखभर रुपयांपर्यंत जात असावी असं वाटणं स्वाभाविक. पण एखाद्या आयआयटी इंजिनिअरपेक्षाही अधिक कमाई करणाऱ्या या केळी उत्पादक शेतकऱ्यानं अधुनिक तंत्रानं केळीच्या शेतीत क्रांती घडवून आणलीय. विशेष म्हणजे कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केल्या बद्दल केंद्र शासनानंही या शेतकऱ्याचा गौरव केलाय. कोण आहे हा शेतकरी? काय केलंय त्यानं?
अवघ्या २६ महिन्यांच्या कालावधीत आधुनिक तंत्राचा वापर करत तीन वेळा केळीचं उत्पादन घेणारे गुजरातचे धीरेंद्र कुमार भानुभाई हे भारतातले एकमेव शेतकरी ठरलेत. मॅलिक बुक ऑफ रेकॉर्ड्समधून शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना नुकताच पुरस्कार मिळालाय.नोकरीच्या मागे न लागता शेतीतूनही चांगली कमाई करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येत आहे.
कमी खर्चात, मर्यादित नैसर्गिक संसाधनांचा वापर करत कमी वेळात केलेल्या या शेतीची देशपातळीवर दखल घेण्यात आली असून त्यांना ६ राज्यस्तरीय आणि १० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कृषी विद्यापीठांनी आणि केंद्र शासनाच्या कृषी व कल्याण मंत्रालयानंही या शेतकऱ्याचं कौतूक केलंय.
कोणत्याही केळी शेतकऱ्यापेक्षा काय वेगळं केलं?
केळी हे पीक साधारणत: १४ ते १६ महिन्यांच्या कालावधीत एकदा काढलं जातं. पण धीरेंद्र कुमारांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरत २६ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा केळीचं पीक काढलं आहे. आणि या केळीची निर्यातही केलीये.
ऊती संवर्धन, ठिबक सिंचन आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापनासारख्या प्रगत तंत्रांचा वापर करत केळीची लागवड या धीरेंद्र कुमारांनी केली. अकार्बिक ते सेंद्रिय पोषक घटकांचे ७०:३० गुणोत्तर वापरत केळीच्या फुलांवर प्रयोग करत केळीवर पडणाऱ्या रोग आणि बुरशीचा धोका त्यांनी कमी केला. फवारणी बॅगिंग आणि कापणी तंत्रामुळे केळीची गुणवत्ता अधिक सुधारल्याचे ते सांगतात.
परदेशात निर्यात
धीरेंद्र कुमार पाच आखाती देशांमध्ये केळीची निर्यात करतात. केळी उत्पादन क्षेत्रातील त्यांची पहिली निर्यात २०१४ साली केली. आजही ते दुबई्, अबुधाबी,ओमान व सौदी अरेबीयाला केळीची निर्यात करतात.
वर्षाचं उत्पन्न इंजिनियरपेक्षाही अधिक
केळी उत्पादनातून या शेतकऱ्याचं उत्पन्न वर्षाला साधारण ७० लाख एवढं आहे. एखाद्या आयआयटी इंजिनियरचा पगार हा साधारण ८ ते १५ लाख रुपयांपर्यंत सांगितला जातो. कोणत्याही नोकरदारापेक्षा अधिक कमाई हा शेतकरी करत असून अनेकांना रोजगारही त्यांनी दिला आहे.
केळी लागवडीसाठी ड्रोन वापरणारा शेतकरी
केळीच्या लागवडीसाठी ड्रोन वापरणारा हा पहिलाच शेतकरी असेल. G9 जातीच्या केळीची लागवड त्यांनी केली असून ९ इंचाच्या आकाराच्या केळीसाठी ते ओळखले जातात. या केळीची भारतभर मागणी असून प्रतिहेक्टर होणारा नफा १६.७० लाख एवढा आहे. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे केळी उत्पादन त्यांना अधिक फायदेशीर झाले आहे. त्यांच्या यशोगाथेने गुजरातसह महाराष्ट्रातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. आधुनिक शेती तंत्र वापरत हेक्टरी १६ ते १७ लाख रुपयांचा नफ मिळवल्यानं त्यांच्या केळीला बाजारपेठ मिळाली आहे.