Success Story: देशभरात अनेक शेतकऱ्यांचा ओढा पारंपरिक पिकांपेक्षा नवनवे प्रयोग करून अधिक पैसे कमवण्याकडे असल्याचं अनेक उदाहरणांमधून दिसून येतं. महाराष्ट्रातही अनेकजण ड्रॅगनफ्रूट या विदेशी फळाच्या शेतीचा आधार घेताना दिसतात. यातून लाखोंचं उत्पन्नही शेतकऱ्यांना मिळतंय. परंतू, एका शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon fruit) उत्पादनातून वर्षाकाठी तब्बल 1 कोटींचं उत्पन्न कमावलंय. या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसह खिदमत ॲग्रो नर्सरी अँन्ड फार्म या व्यवसाय सुरु केला. आज या शेतकऱ्याचं वर्षाकाठचं उत्पन्न एक कोटींहून अधिक आहे. या शेतकऱ्याची यशोगाथा वाचून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही चालना मिळेल हे निश्चित.


सहा वर्षांपूर्वी अकबर अली अहमद यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आसामच्या चिरांग जिल्ह्यातला हा प्रगतशील शेतकरी. अकबर अली यांनी पारंपरिक शेतीतून बाहेर पडत एक धाडसी पाऊल उचलले आणि विदेशी फळांच्या उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अकबर यांनी त्यांच्या 2 हेक्टर जमिनीत "खिदमत ॲग्रो नर्सरी अँड फार्म" ची स्थापना केली. सुरुवातीला सुमारे 14-15 लाख रुपयांची गुंतवणूक केली. रोपे लावण्यासाठी मजबूत खांब, ठिबक सिंचनाची व्यवस्था आणि सेंद्रिय खतांचा वापर करत त्यांनी पायाभूत सुविधा उभारल्या. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे पहिल्या दोन वर्षांतच प्रति हेक्टर 30 टन उत्पादन मिळाले, ज्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाने 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठला. (Agriculture Success)


ड्रॅगन फ्रूट लागवडीची सुरुवात


अकबर अली यांना पारंपरिक पिकांतून नफा मर्यादित असल्याचे जाणवले आणि त्यांनी त्यात बदल घडवायचा ठरवले. बाजारात ड्रॅगन फ्रूटची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी या विदेशी पिकाची शेती करण्याचा नवा प्रयोग केला. सुरुवातीला या अनोळखी पिकासाठी खूप अभ्यास आणि नियोजनाची गरज होती. रोपांची निवड, जमिनीची तयारी, योग्य सिंचन व्यवस्था अशा अनेक बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. उष्णकटिबंधीय हवामानाशी जुळवून घेताना आणि उत्पादन टिकवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी आधुनिक शेती तंत्रांचा वापर करून या आव्हानांवर मात केली. ठिबक सिंचन प्रणालीमुळे पाण्याचा प्रभावी वापर झाला, तर सेंद्रिय पद्धतींमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहिली.ड्रॅगन फ्रूट शेती ही कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी असल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी आदर्श ठरत आहे. तसेच, यातील पोषणमूल्ये आणि बाजारातील मागणी लक्षात घेता, या पिकाला चांगलं भविष्य आहे. अकबर अली यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मेहनतीमुळे त्यांच्या शेताचा आदर्श देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


एका झाडावरून दरवर्षी सरासरी 15-20 किलो फळं


पहिल्या वर्षीच अकबर यांच्या ड्रॅगन फ्रूट झाडांना उत्पादन येऊ लागलं. एका झाडावरून दरवर्षी सरासरी 15-20 किलो फळं मिळू लागली. दोन वर्षांनंतर त्यांचं उत्पादन ३० टनांपर्यंत पोहोचलं. हे फळ बाजारात चांगल्या किमतीला विकलं जात असल्याने त्यांची वार्षिक कमाई 1 कोटींहून अधिक झाली.''फुल येण्यापासून फळं तयार होईपर्यंत फक्त 45 दिवस लागतात. आठ वेळा कापणी करता येते, त्यामुळे बाजारातील मागणी कायम पूर्ण होते,”असं अकबर सांगतात.कृषी जागरणला दिलेल्या माहितीनुसार, अकबर यांनी त्यांच्या शेतात ठिबक सिंचन प्रणाली बसवून पाण्याचा काटेकोर वापर केला. शिवाय, सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी पर्यावरणपूरक शेतीचं उदाहरण निर्माण केलं आहे. 


हेही वाचा:


ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत