Sugarcane : राज्यातील काही भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, ऊसावर मोठ्या प्रमाणात काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं ऊसाचं पीक येतं की वाया जातं? अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ऊसावर या काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, याबाबत तातडीनं कृषी विभागानं उपाययोजना कराव्यात असी मागणी शेतकऱ्यांसह प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबात कृषी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंआहे.
चांगल्या पावसामुळं ऊसाच्या लागवडी वाढल्या, मात्र...
राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं उजनी धरण हे माढा तालुक्यात आहे. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आहे. मागील वर्षी कमी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक काढून टाकले होते. मात्र, यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरण देखील 100 टक्के भरलं आहे, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी केल्या आहेत. मात्र, अचानक ऊसावर या काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ऊसाची लागण करुन दोन ते तीन महिनेच झाले नाहीत, तोवर ऊसावर रोग पडल्यानं पीक हाती येतं की नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कृषी विभागानं उपायोजना सुचवाव्यात
माढा तालुक्यातील प्रामुख्याने उसाचे मुख्य पीक घेतले जाते. ऊस पीक हे आज पर्यंत नगदी पीक आणि बिगर रोगाचे म्हणून उत्पादन घेतले जात होते. ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. विविध कीटक नाशके आणि बुरशी नाशकांची 2 ते 3 वेळा वेळा फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत नाही. त्यामुळे उसाचे पीक हे करपून चालले आहे. त्याची पाने पिवळी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आले. त्या गोष्टीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे मत प्रहार शेतकरी संघटनेते जिल्हा समन्वयक पंडीत साळुंके यांनी व्यक्त केले. दोन महिने झाले उसावरील रोगाने शेतकरी हैराण असताना कृषी विभाग अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास तयार नाही. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या रोगांवर शेतकऱ्यांना उपाय योजना सुचवून या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी पाऊल उचलण्याची विनंती प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे.