मनमाड : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या कांद्याची लागवड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी अगोदरच कांदा लागवड सुरु केल्याने त्यांची पिकं मोठी होऊ लागली आहेत. काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस त्यानंतर पडणारे धुके आणि ढगाळ वातावरण याचा फटका वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर सकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. 


ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. मावा, करपा असे रोग पडू लागल्याने कांद्याच्या पातीचे शेंडे पिवळी पडू लागले आहेत. तर कांद्याला पिळ पडत असल्याने महागडी रोपं खरेदी करुन लागवड केलेल्या कांद्याला जपण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधे खरेदी करुन फवारणी करण्याची वेळ येतेय.फवारणी न केल्यास कांदा खराब होऊन उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे.


केवळ कांदाच नाही तर द्राक्षाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा पसरुन त्यावर रोग पडतात आणि पात पिवळी पडते त्यामुळे कांद्याची वाढ थांबून त्याचा आकार लहान होण्याची शक्यता अधिक असते. कांद्याबरोबरच जिल्ह्याच्या द्राक्ष उत्पादन पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.


सध्या साखर उतरलेल्या घडांना कधी थंडी तर कधी गरम वातावरणामुळे फटका बसत आहे. यामुळं द्राक्षमण्यांना तडे जात असून त्यावर डावणी, भुऱ्या रोगांचा प्रार्दुभाव होत असल्यानं त्यासाठी द्राक्ष उत्पादकांना खर्चिक फवारण्या कराव्या लागत असल्याच कृषी अधिकारी हितेंद्र पगार सांगतात.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





 



महत्त्वाच्या इतर बातम्या :