Covid 19 in India : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी पुन्हा एकदा प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, 9 जानेवारी रोजी देशभरात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनारुग्ण आढळले. ही गेल्या 224 दिवसांतील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ आहे. त्याचवेळी, ही बिघडलेली परिस्थिती पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सोमवारी पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था आणि तात्पुरत्या रुग्णालयांची व्यवस्था याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज पाच राज्यांसोबत बैठक घेणार आहेत, यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आहे.


रविवारी पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या आढावा बैठकीत पीएमओच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृह सचिव अजय भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे संचालक आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधानांनी लोकांना लसीकरण करण्याचे आवाहनही केले.


5.90 लाख सक्रिय कोरोनारुग्ण
रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 5.90 लाखांच्या पुढे गेली आहे.  ही मागील 197 दिवसांतील सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर, गेल्या 24 तासांत देशात 327 लोकांचा मृत्यू झाला असून यासह मृतांची संख्या 4,83,790 वर पोहोचली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha