Nandurbar Agriculture News : परतीच्या पावसानं (Rain) राज्यात धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. हातात आलेले पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचं मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांसह व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीला (Chili Peppers) देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहेत.


खरेदी केलेल्या मालाला विमा कवच द्या, मिरची व्यापाऱ्यांची मागणी


नंदूरबार जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कोट्यावधी रुपयांच्या लाल मिरचीचे नुकसान झालं आहे. त्यामुळं या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्‍यांवर वाळवण्यासाठी टाकली जात असते. मिरचीचा हंगाम सुरु झाला असून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची परतीच्या पावसात ओली होऊन खराब झाली आहे. हजारो क्विंटल मिरची पावसात सापडल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळं नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मिरची व्यापारी संघटनेच्यावतीनं करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.




नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांनी केली मागणी


जिल्ह्यात पावसामुळं मिरचीसह कापूस, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी  दोन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळं आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम वाया गेल्याने सरकारने सरसकट एक रकमी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: