Nandurbar Rain : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. जाता जाता जोरदार पाऊस कोसळत असल्यानं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. नंदूरबार जिल्ह्यातही परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं सोयाबीनसह कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरचीला पावसाचं पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडते. त्यामुळं व्यापारी देखील चिंतेत आहेत.


वेचणीला आलेला कापूस ओला होऊन खराब


गेल्या दोन दिवसापासून नंदूरबार जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार तडाका दिला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली असून काढणीसाठी तयार असलेला कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. तर भात शेतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात अगोदरच कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यात आता कापसाला परतीचा पावसाचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. वेचणीला आलेला कापूस ओला होऊन खराब होत आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरचीला पावसाचं पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडते. यातून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परतीच्या पावसानं शेतकरी आणि व्यापारी दोघांना मोठा फटका दिला आहे. परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्यात परतीच्या पावसानं  (Rain) थैमान घातलं आहे. विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागनं (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसानं झोडपून काढलं आहे. 
आजही राज्यात पावसाचा अंदाज


दरम्यान आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.