Agriculture News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावासानं (Rain) ओढ दिली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. कारण पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. तर काही भागात पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, सोलापूर (solapur) जिल्ह्याला देखील कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यात 50 टक्क्याहून अधिक पिकांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे. 


सात पिकांचे नुकसान हे 50 टक्याहून अधिक 


सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला होता. त्यामुळं कृषी विभागानं पिकांचा सर्व्हे देखील केला. या सर्व्हेक्षणानुसार जवळपास सात पिकांचे नुकसान हे 50 टक्याहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हा अहवाल पीक विमा कंपनीला पाठवण्यात आला असून, नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक गावसाने यांनी दिली आहे.


राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड


यावर्षी राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिकं तर अक्षरशः करपून गेली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पातील पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nanded: यलो मोझ्याकचा सोयाबीनला फटका, एकही शेंग लागली नाही; शेतकऱ्यानं तीन एकर सोयाबीन टाकलं काढून