Agriculture News: एकीकडे पावसानं (Rain) ओढ दिली आहे. तर दुसरीकडं आहे त्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा (Farmers) सापडला आहे. सध्या पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाऊ लागली आहेत, अशातच नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर (Soybean Crop) यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं अर्धापुर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं तीन एक सोयाबीन काढून टाकलं आहे. 


तीन एकरमधील सोयाबीन पिवळे 


नांदेड जिल्ह्यात सध्या सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळं सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील लहान या गावातील शेतकरी केशव नादरे  यांनी आपल्या तीन एकर शेतात सोयाबीन पेरलं होतं. परंतू, ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगामुळं केशव नादरे यांचा तीन एकरमधील सोयाबीन पिवळे पडले  आहे. सोयाबीनच्या पिकाला एकही शेंग लागली नाही. त्यामुळं या शेतकऱ्यानं तीन एकरमधील सोयाबीन काढून टाकलं आहे. 


तात्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, शेतकऱ्यांची सरकारकडं मागणी


दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील अकेन ठिकाणी सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने याचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


पिकावर पिवळ्या रंगाचे चट्टे


पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे चट्टे विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. सोयाबीनची पाने जशी वाढत जातात तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात. या रोगामुळे उत्पादन क्षमता 30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटते. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तर काही वेळेला सोयाबीन शेंगाच लागत नाहीत. यामुळं शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू