Bail Pola : आज बैलपोळ्याचा (Bail Pola) सण आहे. वर्षभर शेतकऱ्यांसोबत (farmers) शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आजच्या दिवशी मोठ्या उत्साहानं शेतकरी आपल्या सर्जा राजाची पूजा करुन त्याला पुरणपोळी भरवतात. या दिवशी कोणताच शेतकरी बैलाला खांद्यावर ओझे देत नाही. दरम्यान, यावर्षीच्या बैलपोळा सणावर लम्पी स्कीन आजाराचं (Lumpy Skin Disease) आणि दुष्काळाचं सावट आहे. ज्या भागात लम्पी आजाराचा प्रभाव वाढला आहे, त्याठिकाणी पोळ्याचा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
बैलपोळा सणासाठी रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा, त्याचबरोबर झुले, विविध प्रकारचे कंडे, गोंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी विविध प्रकारचे कलर तसेच इतर सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात
लम्पीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये बैलाचा महत्व अधोरेखित करणारा सण म्हणजे बैलपोळा. यावर्षी बैलपोळ्यावर लम्पीचा परिणाम दिसून येत आहे. यामुळं प्रशासनाने पोळ्याच्या दिवशी बैल एकत्रित आणणे, बैल फिरवण्यासारख्या विधीवर बंदी आणली आहे. बैल फिरवण्याच्या वेळेस अनेक पशुधन एकत्र येत असतात आणि त्यातून रोगाचा प्रसार होऊ शकतो हे टाळण्यासाठी प्रशासनांना सक्त पाऊल उचललं आहे.
बीड जिल्ह्यात बैलांची मिरवणुक काढण्यास विरोध
बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोग आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशातच आज बैलपोळ्याचा सण साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. लम्पी रोग हा संसर्गजन्य असल्यानं इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी सणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास आणि एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास बीड जिल्ह्यात मनाई करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांनी प्राण्यांमधील संक्रमण आणि रोगप्रतिबंध अधिनियम 2009 नुसार हा मनाई आदेश जारी केला आहे.
लातूर जिल्ह्यात घरगुती स्वरुपात बैलपोळा साजरा करण्याचं आवाहन
लातूर जिल्ह्यातील एकूण 10 तालुक्यातील 197 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्म रोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं बैल पोळा सणानिमित्त मोठया संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आदेशाने लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुपालक आणि शेतकरी यांनी घरगुती स्वरुपात बैल पोळा सण साजरा असे आवाहन करण्यात आले आहे
बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावट
यावर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. पावसाळा सुरु होऊम तीन महिने झाले तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण त्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. तर काही ठिकाणी खरीपाची पिकं वाया देखील गेली आहेत. याचा परिणाम पोळा सणावर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहेत .दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट केली जाते. पण यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आणि वाढती महागाई यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: