हिंगोलीच्या शेतकऱ्याचा नाद खुळा; कुलरचा गारवा देत जरबेरा फुल शेतीचे उत्पादन
Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याने जरबेरा फुलांच्या शेतासाठी जुगाड करत उष्ण वातावरणातही फुलांचे उत्पादन घेतले आहे.
Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील शेतकरी पंकज आडकिने यांनी आपल्या शेतातील जरबेरा फुलांच्या शेतीसाठी जुगाड केला. स्वतःच्या शेतातील दहा गुंठे शेत जमिनीवरील शेडनेटमध्ये जरबेरा फुलांची लागवड केली आहे. परंतु यावर्षी उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याने उत्पादन घटत चालले आहे. या फुलझाडांना गारवा देण्यासाठी चक्क कुलर लावून गारवा दिला. या प्रयोगामुळे फुलांचे उत्पादन वाढवले असून फुलझाडांवर उष्णतेचा परिणाम होण्यापासून रोखण्यास यश मिळाले आहे.
दरवर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असल्याने उन्हाळ्यातील पिकांना मोठा फटका बसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील शेतकरी पंकज अडकिने यांनी शेतातील दहा गुंठे शेतजमिनीवर शेडनेट करत उत्पादन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी मोठा आर्थिक खर्च सुद्धा त्यांना करावा लागला आहे. जवळपास दहा गुंठ्यांसाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च करून शेडनेट करून अडीच लाख रुपये खर्च करत जरबेरा फुल शेती लागवड केली आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या फुल शेतीचे उत्पादन उत्तम पद्धतीने घेतले आहे.
परंतु अपेक्षित असे उत्पादन उन्हाळ्यामध्ये होताना दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या तापमानामुळे जरबेरा फुलांची झाडे सुकून जात आहेत. परिणामी फुलांच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. या उन्हाचा या पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी शेतकरी पंकज आडकिने गेली अनेक दिवस चिंतेत होते. काही शेतकरी मित्रांशी चर्चा केल्यानंतरही त्यावर अपेक्षित असा कुठलाही पर्याय निघत नव्हता. शेवटी कंटाळून काहीतरी केलं पाहिजे म्हणून सहा हजार रुपयाला एक प्रमाणे पाच कूलर हिंगोली बाजारपेठेमधून खरेदी करून या जरबेरा फुल शेतीला गारवा देण्याचे ठरवलं
आता या कूलरच्या साह्याने आता जरबेरा फुल शेतीला गारवा देण्याचा प्रयत्न हे शेतकरी करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येताना दिसून येत आहे. जरबेरा फूल शेतीच्या उत्पादनात अगोदरच्या तुलनेत विक्रमी अशी वाढ झाली आहे. त्यामुळे अनोख्या पद्धतीने शक्कल लढवून उत्पादन वाढवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.