भारतात गव्हाच्या पिठाची किंमतही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, भारतात गेल्या एका वर्षामध्ये पिठाची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे.



सरकारी आकडेवारीनुसार, सुटे पीठ 38 रुपये प्रतिकिलो रुपयाने विकले जात आहे, तर पॅकेजिंगमधील पीठ 45-55 रुपये प्रतिकिलो आहे.



निर्यातीवर बंदी असतानाही गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारवर तणाव वाढला आहे.



पण पिठाच्या किंमती वाढण्याचं नेमकं कारण काय?



भारत जगभरात गहू उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकांवर आहे, असे असले तरी देशात पिठाचा दर वाढत आहे.



महागाईही वाढत आहे. गव्हाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. मैदा आणि रव्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.



उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहार ही प्रमुख गहू उत्पादक राज्ये आहेत.



गहू उत्पादनात भारत हा जगातील दुसरा देश आहे, पण हवामान बदलामुळे 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन घटले आहे.



हवामान बदलामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे गव्हाचे उत्पादन 129 दशलक्ष टनांवरून 106 दशलक्ष टनांवर आले.



गव्हाच्या सरकारी खरेदीत झालेली घट ही पिठाच्या किमती वाढण्यामागचे दुसरे कारण आहे.



2020-21 मध्ये, भारतीय सरकारी संस्थांनी 43.3 दशलक्ष टन गहू खरेदी केला होता. 2021-22 मध्ये हा आकडा 18 दशलक्ष टनांच्या जवळपास पोहोचला. म्हणजे हा आकडा निम्म्याहून खाली घसरला.



फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. यानंतर जगभरात गव्हाची निर्यात ठप्प झाली. असे असतानाही भारताने जगातील इतर देशांना गव्हाची निर्यात सुरूच ठेवली.



कृषि तज्ज्ञ परमजीत सिंह यांच्या मते, सरकारच्या दूरदृष्टी नसलेल्या धोरणाचा हा परिणाम आहे. उत्पादन 2.2 टक्क्यांनी घटले, तरीही सरकारने निर्यात वाढवली. परिणामी देशात गव्हाचे दर वाढले.