दीपोत्सवानिमित्त अयोध्येला विविध प्रकारच्या दिव्यांनी सजवण्याचं काम वेगानं सुरू आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य आणि दिव्य रामलला मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यापूर्वी दिवाळीनिमित्त येथे दिव्यांच्या उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दीपोत्सवाबाबत सरकार आणि रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांनंतर भगवान श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील. दिवाळीला अयोध्येतील राम की पौरी येथे 24 लाख दिवे लावले जातील. गोस्वामी तुलसीदास लिखित श्री रामचरितमानसच्या सात अध्यायांवर आधारित सुंदर द्वार अयोध्येत बांधलेल्या धर्ममार्गावर बांधले जात आहेत. पर्यटन अधिकारी आरपी यादव यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, अयोध्येला पौराणिक वैभव आणि प्रतिष्ठेनं सजवलं जात आहे. त्यासाठी अयोध्येत कोट्यवधी रुपयांची विकासकामं केली जात आहेत. महाद्वारांच्या बांधकामामुळे दीपोत्सवानिमित्त भाविकांना अयोध्येत पोहोचल्यावर त्रेतायुग आणि प्राचीन अयोध्येचा अनुभव येणार आहे.