गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.

रविवारी (9 एप्रिल), सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे तर नुकसानात अधिकच भर पडली आहे.

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील 13 हजार 909 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे.

नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 208 गावे बाधित तर 25 हजार 985 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

तीन दिवसाच्या पावसाने एकूण 13 हजार 909 हेक्टरवरील शेतीपिके आणि फळबागांचे नुकसान झाले.

कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून 10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला आहे.

कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

राज्यात अवकाळी पावसाचा नाशिकला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.