कधीतरी रडणं देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. रडणं ही भावनिक असल्याचं चिन्ह आहे. त्यामुळे आपण रडलो तर आपण कमकुवत होऊ असा गैरसमज करणं चुकीचं ठरु शकतं. जसं हसण्यामुळे तुम्हाला फायदे होऊ शकतात तसच रडण्यामुळे देखील तुम्हाला काही फायदे होऊ शकतात. तुम्ही जेव्हा रडत असता तेव्हा तुमच्या शरीरातील कोर्टिसोल या हार्मोनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते. रडताना तुम्ही भावनिकरित्या व्यक्त होत असता. त्यामुळे तुमचा भावनिक ताण देखील कमी होण्यास मदत होते. रडण्यामुळे तुमच्या नसांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि आपल्या हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहू शकते. रडल्यामुळे तुम्ही व्यक्त झालेले असता. त्यामुळे तुमच्या मनावरील भार हलका होऊन तुम्हाला शांत झोप लागू शकते. रडणं हे तुमच्या डोळ्यांसाठी देखील चांगले ठरु शकते. रडल्यामुळे डोळ्यातील अनेक जंतू बाहेर येतात. त्यामुळे तुमचे डोळे स्वच्छ होण्यास मदत होते.