‘बेबी’, ‘पिंक’ आणि ‘मुल्क’सारख्या चित्रपटातून तापसीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज (1 ऑगस्ट) अभिनेत्री तापसी पन्नू आपला वाढदिवस साजरा करत आहे.
अभिनेत्री तापसी पन्नूचा जन्म 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीतील एका सामान्य शीख कुटुंबात झाला. तिचे वडील दिलमोहन सिंह हे व्यापारी आहेत, तर आई निर्मलजीत पन्नू या गृहिणी आहेत.
वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून तापसीने कथक आणि भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. 8 वर्षे तिने नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे.
तापसी पन्नूचे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीतील पब्लिक स्कूलमधून पूर्ण झाले आहे. बालपणापासूनच तापसी पन्नूला अभ्यासासोबतच खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यातही रस होता.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तापसीने गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर तिला एमबीए करायचे होते. पण, तिला तिच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्यास देखील सुरू केले.
तापसीने जवळपास 6 महिने ही नोकरी केली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तापसी पन्नूने बराच काळ मॉडेलिंगही केले.
मॉडेलिंग सुरु केल्यानंतर 'गेट गॉर्जियस पेजेंट' स्पर्धेमध्ये अर्ज केला आणि त्यात तिची निवड देखील झाली. यानंतर तपासीने कोकाकोला, मोटोरोला, PVR Cinemas, डाबर, एअरटेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी जाहिराती केल्या आहेत.