सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडूनही राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते त्याठिकाणी पोहोचले. पण, त्यासोबतच महायुतीचे नेतेदेखील तिथे दाखल झाले. खासदार नारायण राणेंसह माजी खासदार निलेश राणे देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले. आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने आले. त्यानंतर काही काळ राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी निघून गेले.