हिरवाईने नटलेल्या कोकणात सह्याद्रीच्या कुशीतून वाट काढत उंच डोंगरावरुन मनमुरादपणे फेसाळत कोसळणारे अनेक धबधबे आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील.

मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पासून जवळच असलेल्या कुंभवडे गावात एक असा नयनरम्य धबधबा जो दोन्ही बाजूंनी पाहता येतो म्हणूनच पर्यटकांना आकर्षित करतो तो बाबा धबधबा.

माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी मालकीच्या जागेत सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेला कुंभवडे गावातील हा धबधबा केगदवाडीचा धबधबा म्हणून या आधी प्रचलित होता.

मात्र बाबासाहेब कुपेकरांनी ही जागा विकत घेतल्यानंतर हा धबधबा बाबा धबधबा म्हणून प्रचलित झाला.

कोकणातील एकमेव असा धबधबा आहे, ज्या धबधब्याचं सौदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं.

या धबधब्याचं आगळंवेगळं वैशिष्ट्ये म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना धबधबा पाहायला मिळतो.

खरंतर हा नैसर्गिक धबधबा नसून तो अशा पद्धतीने बनवला गेलेला धबधबा आहे.



200 ते 250 फुटांवरुन शंकराच्या जटेतून जशी गंगा वाहते तशा पद्धतीने हा धबधबा कोसळत आहे.

हिरव्यागार निसर्ग आणि त्यातून वाहणारे धबधबे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात.