बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसजवळ सापाने दंश केला असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आज सकाळी 9 वाजता सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले. नाताळची सुट्टी आणि सोमवारी 27 डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान आणि त्याच्या जवळचे मित्र पनवेल येथील फार्म हाऊसवर होते. सुट्टीच्या काळात सलमान खान पनवेल येथील फार्म हाऊसवर येत असतो. शनिवारी मध्यरात्री सलमान खान फार्म हाऊस बाहेर पडला होता. त्याच वेळी त्याच्या पायाला सापाने दंश केला. सापाने दंश केल्याचे समोर आल्यानंतर तातडीने प्राथमिक उपचारानंतर कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.