दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली तरीही या महिन्यात पाण्याचा दुष्काळ पाहायला मिळतोय.
महापुरामुळे वाहून आलेला गाळ आणि मातीमुळे नद्यांचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी आतापासूनच गावात पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला आहे.
नांदीवसे गावातील गणेशपूर या गावची लोकसंख्या जवळपास 1500 आहे. या गावाच्या शेजारी वाहणारी वैतनगंगा ही नदी, तर दुसऱ्या बाजूला आकले गावची नदी या दोन्ही नद्यांचा संगम या गावात होतो.
या दोन्ही नद्या वाशिष्टीच्या उपनद्या असून सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहतात. या दोन नद्यांच्या प्रवाह मार्गावर पंधरा गावे वसलेली आहेत. पण आज या नद्या कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे गावकरी चिंतेत पडले आहेत. पाण्याची पातळी खालवल्याने गावतील बोअरेवलला सुद्धा मुबलक पाणी मिळत नाही आहे.
नदीपात्रात कुठेही पाण्याचा साठा नाही हे निदर्शनात आले. वाहून आलेले दगड गोटे आणि गाळ यामुळे नदीपात्रात बदल झाला आहे. आज या कोरड्या नद्यामुळे गावकरी गाव सोडून निघाले आहेत.
एकीकडे गावागावांत कोरड्या नद्या असतांना दुसरीकडे मात्र पावसाळ्यात वाहणाऱ्या ओढ्यावर नैसर्गिक स्त्रोत शोधून गावकरी बंधारे बांधत आहेत.
गुळवणे गावात शेकडो महिलांनी एकत्रित येउन वाहत्या पाण्यावर 10 बंधारे बांधले आहेत.
गावागावात अशा प्रकारचे बंधारे बांधल्यास गावच्या पाण्याची समस्या दुर होऊ शकते.