हिवाळ्यात लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो, त्यामुळे याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. थंडीच्या मोसमात लहान-मोठे सर्वांनाच सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या होतात. सध्या तापमानही कमालीचे खाली घसरले आहे. हिवाळ्यात खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास ती हवा फुफ्फुसांमध्ये जाऊन लहाम मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. न्यूमोनिया श्वासासंदर्भातील एक गंभीर समस्या आहे. हा आजार बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे होतो. हिवाळ्यात हवेत गारवा असल्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता अधिक असते. तसेच सध्या हवेची गुणवत्ता देखील चांगलीच खालावली आहे. त्यामुळे याचा धोका अधिक वाढला आहे. हिवाळ्यात लहान मुलांना खोकला, सर्दी, ताप आणि विषाणू संसर्गाचा धोका अधिक असतो. सर्दी-खोकला चार ते पाच दिवसात बरा होतो. पण एक वर्षापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्दी-खोकला 4-5 दिवसांत बरा न झाल्यास हा संसर्ग गंभीर होऊ शकतो. त्याचे रूपांतर न्यूमोनियामध्ये होते. यामध्ये वेळीच उपाय न करता निष्काळजीपणा केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच मुलांची डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.