Nalasopara Demolition : नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली आहे.
नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगरी येथे डंपिंग ग्राऊंड आणि मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित भूखंडावर 41 अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या.
अग्रवाल नगरीतील या 41 अनधिकृत इमारतींवर गुरुवारपासून मनपाने तोडक कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली.
गुरुवारी संथगतीने तोडक कारवाई करण्यात आली. गुरुवारी तोडलेल्या इमारतींचा काही शिल्लक भाग शुक्रवारी तोडण्यात आला. जमीनदोस्त केलेल्या इमारतींचा मलबा बाजूला करून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला.
2006 पूर्वी या जमिनीवर 41 बेकायदा इमारती बांधण्यात आल्या असून, सध्या तीन हजारांहून अधिक कुटुंबे राहतात. या जमिनीबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात होते.
सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सर्व 41 इमारती बेकायदा ठरवून त्या पाडण्याच्या सूचना दिल्या. रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण तेथेही त्यांची निराशा झाली.
त्यानंतर आता मनपाकडून सुमारे 30 एकर जागेवरील 41 अनधिकृत इमारती पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
या इमारतींमधील रहिवाशांच्या डोक्यावरचं छप्पर उडाल्याने त्यांना वडापाव खात आणि थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली आहे.